शाहिद पठाण
गोंदिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील बिरसी विमानतळावरुन 13 मार्च 2022 पासून सुरू झालेली प्रवासी वाहतूक सेवा अवघ्या सहा महिन्यांतच बंद पडली. त्यानंतर आता इंडिगो कंपनीने या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा करण्याचे कंत्राट घेतले आहे. तब्बल दहा महिन्यांच्या कालावधीनंतर उद्यापासून या गोंदिया– हैदराबाद – तिरुपती (Gondia to Tirupati Flight Service) विमानसेवेला प्रारंभ होत आहे. यासाठीची सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रवाशांमध्येसुद्धा उत्साहाचे वातावरण आहे.
इंडिगो कंपनीने पहिल्या टप्प्यात गोंदिया- हैदराबाद-तिरुपती अशी प्रवासी वाहतूक सेवा बिरसी विमानतळावरून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिरसी विमानतळावरून प्रवाशांना थेट हैदराबाद आणि तिरुपतीसाठी उड्डाण घेता येणार आहे, तर गोंदिया येथून तिरुपतीला जाण्यासाठी विमान बदलण्याची गरज नसून बिरसी विमानतळावरून हैदराबादला जाणारेच विमान पुढे तिरुपतीला जाणार आहे.
त्यामुळे तिरुपतीला देवदर्शनाकरिता जाणाऱ्या प्रवाशांसाठी ते सोयीचे होणार आहे. उद्या दुपारी 12:30 मिनिटांनी बिरसी विमानतळावरून इंडिगोचे विमान हैदराबाद आणि तिरुपतीसाठी उड्डाण घेणार आहे. यासाठी अनेक प्रवाशांनीसुद्धा तिकीट बुक केले आहे. सर्वाधिक तिकिटांची बुकिंग ही तिरुपतीसाठी झाली असल्याचे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिरसी येथून प्रवासी वाहतूक सेवा होत असून, याला प्रवाशांचासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले, तर या सेवेला घेऊन बिरसी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक सोयीसुविधा व प्रक्रिया पूर्ण केली आहे. या विमान प्रवासाचे अंदाजे भाडे तीन ते साडेतीन हजार रूपये असणार आहे. ही विमानसेवा सातही दिवस उपलब्ध असणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.