मुंबई : हिंदू दिनदर्शीकेनुसार, नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून मानली जाते. या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा दिवस गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2023) नावाने साजरा केला जातो. गुढी म्हणजे ध्वज आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा म्हणतात. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार, यावेळी गुढीपाडवा 22 मार्च 2023 ला म्हणजेच उद्या साजरी होणार . या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्यानंतर विजयाचे प्रतीक म्हणून घरासमोर सुंदर गुढी उभारतात आणि तिची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.
विशेषतः हा सण कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशात साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा दिवस आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी श्री खंड, पुरणपोळी, खीर असे खास पदार्थ तयार केले जातात. गुढीपाडव्याबद्दल असे म्हटले जाते की रिकाम्या पोटी पुरणपोळीचे सेवन केल्याने त्वचाविकारांची समस्याही दूर होते.
धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी जगत्पिता ब्रह्माजींनी विश्वाच्या निर्मितीच्या कार्याला सुरुवात केली आणि या दिवसापासूनच सतयुगाची सुरुवात झाली.म्हणूनच या दिवसाला सृष्टीचा पहिला दिवस किंवा युगादि तिथी असेही म्हणतात. या दिवशी चैत्र नवरात्री घटस्थापना, ध्वजारोहण, संवत्सराचे पूजनदेखील होते.
रामायण काळात दक्षिण भारत बालीच्या जुलमी राजवटीत होता. सीताजींचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू राम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर प्रभू रामाने बालीचा वध करून तेथील लोकांना त्याच्या कुशासनातून मुक्त केले. हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी गुढी किंवा विजय पताका फडकवली जाते.
एका ऐतिहासिक आख्यायिकेनुसार शालिवाहन नावाच्या कुंभार मुलाने मातीच्या सैनिकांची फौज बनवली आणि त्यांच्यावर पाणी शिंपडून त्यात प्राण फुंकले आणि या सैन्याच्या मदतीने शत्रूंचा पराभव केला. या विजयाचे प्रतीक म्हणून शालिवाहन शक संवताची सुरुवातही मानली जाते.
असे म्हटले जाते की प्राचीन भारतातील महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञाने त्यांच्या संशोधनाच्या परिणामी, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवस, महिना आणि वर्ष मोजून भारतीय पंचांगाची रचना केली.
या दिवशी उज्जैनचा सम्राट विक्रमादित्य याने शकांचा पराभव करून विक्रम संवत सुरू केले. या दिवशी भगवान विष्णूंनी माशाचा अवतार घेतला, या दिवसापासून दिवस रात्रीपेक्षा मोठा होऊ लागतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)