Guru Pradosh Vrat 2023: गुरू प्रदोष व्रतात अशा प्रकारे करा महादेवाची पुजा, या चुका अवश्य टाळा

| Updated on: Feb 02, 2023 | 10:41 AM

आज माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील गुरु प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रतामध्ये भगवान शंकराची भक्तीभावाने पूजा केल्याने इच्छित फळ मिळते असे म्हटले जाते.

Guru Pradosh Vrat 2023: गुरू प्रदोष व्रतात अशा प्रकारे करा महादेवाची पुजा, या चुका अवश्य टाळा
प्रदोष व्रत
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, हिंदू धर्मात प्रदोष व्रताचे (Guru Pradosh Vrat) विशेष महत्त्व सांगितले आहे. प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा पाळले जाते. एक शुक्ल पक्षात आणि दुसरा कृष्ण पक्षात. हा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे. जर प्रदोष व्रत गुरुवारी पडले तर त्याला गुरु प्रदोष व्रत म्हणतात. आज माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील गुरु प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रतामध्ये भगवान शंकराची भक्तीभावाने पूजा केल्याने इच्छित फळ मिळते असे म्हटले जाते.

गुरु प्रदोष व्रताचे महत्त्व

ज्योतिषांच्या मते, जर एखाद्याच्या वैवाहिक जीवनात त्रास, संकट किंवा वादविवाद होत असतील तर त्यांनी गुरु प्रदोष व्रत पाळावे. यामुळे तुम्हाला भगवान शिव तसेच गुरु देव बृहस्पती यांचा आशीर्वाद मिळतो. गुरु प्रदोष व्रताचे पुण्य शंभर गाईंचे दान करण्यासारखे आहे असे म्हणतात. गुरु प्रदोष व्रताचे पालन केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. गुरु प्रदोष व्रत शत्रूंना शांत करणारं आहे.

गुरु प्रदोष व्रताची शुभ मुहूर्त

गुरु प्रदोष व्रत 02 फेब्रुवारी रोजी दुपारी 04.25 ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 03 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 06.58 पर्यंत पाळले जाईल. प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळातच पूजेचे विशेष महत्त्व आहे. प्रदोष व्रतामध्ये संध्याकाळी सूर्यास्ताच्या 45 मिनिटे आधी आणि सूर्यास्तानंतर 45 मिनिटांपर्यंत भगवान शिवाची पूजा केली जाते.

हे सुद्धा वाचा

गुरु प्रदोष व्रताची उपासना पद्धत

प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. या दिवशी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे लागते. शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाला दूध, दही आणि पंचामृताने अभिषेक करा. त्यानंतर पिवळ्या किंवा पांढर्‍या चंदनाने शिवाला टिळा लावावा. भगवान शंकराला धतुरा आणि बेलपत्र अर्पण करा आणि भगवान शंकराची पूजा करा. त्याचबरोबर ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. माता पार्वतीचेही ध्यान करा.

गुरू प्रदोष व्रताला या चुका टाळा

गुरू प्रदोष व्रताच्या दिवशी देवघराची नीट स्वच्छता करावी. पूजेच्या ठिकाणी घाण होऊ देऊ नका. या दिवशी लसूण आणि कांद्यापासून बनवलेले अन्न खाऊ नये. मांस आणि मद्य सेवनापासून दूर राहा. घरात भांडण- तंटा करू नका. याशिवाय सकाळी उशिरापर्यंत झोपू नका. स्नान केल्याशिवाय शिवलिंगाला स्पर्श करू नये. जे व्रत करणार आहेत त्यांनी काळे कपडे अजिबात घालू नयेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)