नागपुरातील मानाचा बाप्पा नागपूरच्या राजाला निरोप देण्यात आलाय. नागपूर शेजारी असलेल्या कोराडी तलावात नागपूरच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी बँड पथकानं (Band Squad) भन्नाट डान्स केला.महिलांनीही यावेळी ठेका धरला. फुगडी खेळत महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी डोक्यावर टोपी घातली होती. जय गणेश असं या टोपीवर लिहिलं होतं. क्रेनच्या (Crane) साहाय्यानं बाप्पाची मूर्ती कोराडी तलावात (Koradi Lake) विसर्जित करण्यात आली.
शहरात दहाही झोनमध्ये प्रभागनिहाय विविध 204 भागात एकूण 390 कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. 4 फूटाखालील सर्व श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टॅंकमध्ये व्हावे म्हणून चौकाचौकात व मैदानात कृत्रिम टॅंक तयार करण्यात आले आहे. यात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 35, धरमपेठ झोन अंतर्गत 67, हनुमानगर झोन अंतर्गत 48, धंतोली झोन अंतर्गत 37, नेहरूनगर झोन अंतर्गत 44, गांधीबाग झोन अंतर्गत 41, सतरंजीपुरा झोन अंतर्गत 27, लकडगंज झोन अंतर्गत 40, आशीनगर झोन अंतर्गत 15, मंगळवारी झोन अंतर्गत 36 असे शहरात 390 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.
चार फुटापेक्षा जास्त उंचीच्या श्रीगणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे कोराडी तलाव परिसरात व्यवस्था करण्यात आलेली आहे. तलाव परिसरात असलेल्या 60 फूट खोल आणि 150 फूट रुंद कृत्रिम टँकमध्ये मोठ्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. यासाठी 3 क्रेन सह पोकलेन आणि तीन टिप्परची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा व पोलिस प्रशासनाचे सहायता कक्षाचे स्टॉल विसर्जनस्थळी उभारण्यात आले आहे. आपात्कालीन वैद्यकीय सेवेसाठी तीन रुग्णवाहिकांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सोनेगाव आणि फुटाळा तलाव परिसरातही रुग्णवाहिकांची व्यवस्था आहे.