ओरिसा येथे असलेले जगन्नाथ पुरी (Jagannath Puri) मंदिर हे भारतातील चार पवित्र तीर्थांपैकी एक आहे. येथे दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये भव्य रथयात्रा (Jagannath Puri rathayatra 2022) काढण्यात येते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या रथयात्रेत पोहोचतात. जगन्नाथ मंदिरात भगवान श्रीकृष्ण जगन्नाथ रूपाने विराजमान आहेत. याच ठिकाणी त्यांच्यासोबत त्याचा मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा विराजमान आहेत. आषाढातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या रथयात्रेत रथ कोणत्याही यंत्राने किंवा प्राण्याने नाही तर भाविकांनी ओढला जातो. पुरीमध्ये भगवान जगन्नाथाशिवाय मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती लाकडाच्या आहेत. या मूर्ती आणि मंदिराबद्दल काही रहस्य आहेत (Jagannath Puri Mysteries and myths). पहिले रहस्य म्हणजे या तिन्ही मूर्ती अपूर्ण आहेत आणि दुसरे म्हणजे मंदिराची सावली पडत नाही. या मूर्ती का अपूर्ण राहिल्या आणि भगवान जगन्नाथाच्या अपूर्ण मूर्तीची पूजा का केली जाते त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
पौराणिक कथेनुसार, राजा इंद्रद्युम्न जेव्हा पुरीमध्ये मंदिर बांधत होता, तेव्हा त्याने भगवान जगन्नाथाची मूर्ती बनवण्याचे काम शिल्पी विश्वकर्मा यांच्याकडे सोपवले होते. मूर्ती बनवणाऱ्या भगवान विश्वकर्माने राजा इंद्रद्युम्नसमोर एक अट ठेवली की, तो दरवाजा बंद करून मूर्ती बनवेल आणि जोपर्यंत मूर्ती तयार होत नाही तोपर्यंत आत कोणीही प्रवेश करणार नाही. कोणत्याही कारणास्तव मूर्ती पूर्ण होण्याआधी दरवाजा उघडल्यास ते मूर्ती बनविण्याचे काम बंद करतील.
आत मूर्ती घडवण्याचे काम चालू आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी राजा दरवाजाबाहेर उभा राहून, मूर्ती घडवण्याचा आवाज ऐकत कानोसा घेत असे. एके दिवशी राजाला आतून कोणताच आवाज आला नाही, त्यामुळे विश्वकर्मा काम सोडून गेले असे त्याला वाटले. यानंतर राजाने दरवाजा उघडला. यानंतर भगवान विश्वकर्मा तेथून अदृश्य झाले आणि भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती अपूर्ण राहिल्या. त्या दिवसापासून आजतागायत या मूर्ती येथे विराजमान आहेत. आणि आजही देवाची याच रूपात पूजा केली जाते.
भग्न किंवा अपूर्ण मूर्तीची पूजा करणे हिंदू धर्मात अशुभ मानले जात असले तरी हिंदूंच्या चार धामांपैकी एक असलेल्या पुरीच्या जगन्नाथ धाम येथे पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते. तिन्ही देवांवर श्रद्धा आणि निष्ठा ठेवल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)