सनातन परंपरा कायम राखण्यात वनवासी समाजाचं योगदान मोठं : दत्तात्रय होसबळे

| Updated on: Feb 10, 2025 | 5:09 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी प्रयागराज महाकुंभात आदिवासी समागमाच्या समारोपाच्या निमित्ताने आदिवासी समाजाला सनातन हिंदू परंपरेचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. विदेशी विचारधारा आणि धर्मांतराच्या संकटांचा सामना करण्यासाठी एकतेची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

सनातन परंपरा कायम राखण्यात वनवासी समाजाचं योगदान मोठं : दत्तात्रय होसबळे
Dattatreya Hosabale
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सनातन हिंदुत्वाची परंपरा वाचवण्यात आमच्या वनवासी समाजाचं मोठं योगदान आहे. याच ज्ञान आणि संस्काराच्या परंपरेचं संवर्धन करण्यासाठी आदिवासी समाजातील संतांनी अथक प्रयत्न करण्याची गरज आहे, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी म्हटलं आहे.

अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने प्रयागराज महाकुंभमध्ये आयोजित आदिवासी समागमाचे आज संत समागमाने समारोप झाला. यावेळी सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या समागमाला कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह, गंगाधर महाराज आणि दादू दयाल आदी उपस्थित होते.

एकता कायम ठेवा

हिंदुत्व, भारतीय सनातन परंपरेच्या समोर आज विदेशी विचारधारा थोपवली जात आहे. तसेच धर्मांतरही केले जात आहे. ही दोन मोठी संकटे आपल्यासमोर आहेत. या संकटांचा सामना करताना आदिवासी संतांनी जंगल परिसरात प्रचंड मेहनत घेतलीय. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज हिंदू धर्म जिवंत आहे. येणाऱ्या काळात पर्यावरण, अनुसंधान, शिक्षण संस्कार, धर्म जागरण आणि सेवेच्या माध्यमातून आदिवासी समाजात जागृती आणून आपल्या समाजाची एकता आणि अस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असं दत्तात्रय होसबळे म्हणाले.

Janjati Samagam

सनातन संस्कृती मजबूत करा

कल्याण आश्रम याच दिशेने कार्यरत आहे. यासाठी जनजाती क्षेत्रातील सर्व साधू संतांनी कल्याण आश्रमाला साथ देऊन सनातन संस्कृतीला मजबूत केलं पाहिजे, अशी अपेक्षा होसबळे यांनी व्यक्त केली. या समागमात देशभरातील विविध प्रांतातील 77 जनजाती समाजाचे संत, महंत उपस्थित होते. यातील काही संतांनी आदिवासी समाजात काम करत असताना त्यांना आलेल्या अडचणी आणि समस्यांबाबतचे अनुभव मांडले.

तो प्रयत्न हाणून पाडा

संत समागमाची प्रस्तावना कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह यांनी केली. आपल्या आदिवासी समाजात फूट पाडण्याचे असंख्य प्रयत्न आदिवासी विभागात सुरू आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्व साधू संतांनी पुढे आलं पाहिजे, असं आवाहन सत्येंद्र सिंह यांनी केलं. उपस्थित साधू संतांना उत्तर प्रदेश सरकारच्या कुंभ मेळा समितीने भेट वस्तू देऊन सन्मानित केलं.