प्रतिनीधी : रवी लव्हेकर
पंढरपूर : उद्या कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi 2023) आहे. या निमीत्त पंढरपूरात लाखो भक्तांचे आगमन झाले आहे. विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरात भक्तांची गर्दी, मंदिर प्रशासनाकडून विशेष व्यवस्था वर्षभरात एकवीस एकादशी असतात त्यात आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व असते. आषाढी एकादशीला जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि कार्तिकी एकादशीला ते जागे होतात. म्हणूणच या एकादशीला देवउठी एकादशी देखील म्हणतात. कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरूवात होते आणि लग्न, मुंज यासाख्या विधींनाही सुरूवात होते. या वर्षी कार्तिकी एकादशी उद्या 23 नोव्हेंबरला साजरी होत आहे. पंढरपूरमध्ये भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून अनुचीत प्रकार टाळण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहे.
कार्तिकी एकादशी निमीत्त पंढरपूरात पाच ते सहा लाख भाविक येण्याची शक्यता आहे. उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा होणार आहे. कार्तिकी यात्रेसाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि दर्शन रांगेतील घुसखोरी टाळण्यासाठी तसेच भुरट्या चोऱ्या आणि कोणताही गर्दीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर प्रशासनाने 120 सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येत आहे.
कार्तिकी एकादशी निमीत्त पंढरपूरात दाखल होणाऱ्या भाविकांचा प्रशासनातर्फे मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. तीन दिवस कार्तिकी वारीच्या निमित्ताने येणाऱ्या वारकऱ्यांची महाआरोग्य शिबिरात सर्वरोग निदान तपासणी करण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी औषधोपचार आणि विविध तपासण्या करून गरज असल्यास पुढील शस्त्रक्रियेची सोयसुद्धा मोफत केली जाणार आहे. महाआरोग्य शिबिरासाठी पंढरपूरच्या 65 एकर क्षेत्रात आरोग्य मंडप उभारण्यात आला आहे. या शिबिरासाठी जवळपास 2 हजार डॉक्टरांच्या आणि 5 हजार स्वयंसेवक शिवसैनिकांच्या मदतीने 11 लाख रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. सोनोग्राफी एक्सरे, हृदयरोग तपासणी, शुगर तपासणी आदी तपासणी मोफत केली जाणार आहे.