मुंबई : हिंदू धर्मात सर्व पौर्णिमा आणि अमावस्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात परंतु यापैकी काही अमावस्या आणि पौर्णिमा या तिथी विशेष आहेत. आश्विन महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे, या दिवशी शरद पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. याला कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2023), रास पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत असेही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या किरणांवर अमृताचा वर्षाव होतो असे मानले जाते. त्यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्री खीर किंवा दूध चंद्रप्रकाशात ठेवले जाते, नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. हे उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्रदान करते. याशिवाय शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते असा उल्लेखही धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो, त्यामुळे या दिवशी ती आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होते असेही मानल्या जाते. शरद पौर्णिमेच्या रात्री विधीनुसार लक्ष्मीची पूजा केल्याने घरात नेहमी ऐश्वर्य आणि सुख संमृद्धी नांदते.
पंचांगानुसार, या वर्षी आश्विन महिन्याची पौर्णिमा शनिवार, 28 ऑक्टोबरला पहाटे 4.17 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी रविवार, 29 ऑक्टोबरला पहाटे 01.53 वाजता समाप्त होईल. शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी उदया तिथी आणि पौर्णिमेच्या चंद्रोदयाच्या वेळेनुसार साजरी केली जाईल. 2023 मध्ये शरद पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 05:20 आहे.
असे मानले जाते की शरद पौर्णिमेला चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या दुधाचे सेवन केल्यास रोगांपासून मुक्ती मिळते. हे दूध त्वचेच्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही लाभदायक असते. डोळ्यांच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनाही या दुधाचा फायदा होतो. याशिवाय अनेक अर्थांनी हे विशेष मानले जाते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)