मुंबई : आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या दिवशी गुरुपौर्णिमेसह कोकिळा व्रत (Kokila Vrat Puja) आणि लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केली जाते. यंदा कोकिळा व्रत 2 जुलै रविवारी साजरा होणार आहे. विवाहित स्त्रिया सुखी वैवाहिक जीवन आणि अविवाहित मुलींना सुयोग्य पती मिळावा यासाठी हे व्रत करतात. या दिवशी अविवाहीतांना भगवान शिवासारखा पती मिळावा यासाठी शुभेच्छा दिल्या जातात. जाणून घेऊया कोकिळा व्रताचा शुभ मुहूर्त, उपासना पद्धत आणि व्रत कथा.
आषाढ पौर्णिमेची तारीख 2 जुलै रोजी रात्री 8.21 वाजता सुरू होईल आणि 3 जुलै रोजी सायंकाळी 5.28 वाजता संपेल. कोकिळा व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त रात्री 8.21 पासून सुरू होईल, जो रात्री 9.24 पर्यंत चालेल. सुमारे 1 तास, भगवान शिव आणि माता सतीची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ असेल.
पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर मंदिरात जाऊन भगवान शिवाला गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करा. भांग, धतुरा, बेलपत्र, विधिपूर्वक फळे अर्पण करून शिवजी आणि सती मातेचे ध्यान करा आणि व्रताचा संकल्प घ्या. पूजेच्या वेळी शिवाला पांढरी फुले आणि माता सतीला लाल फुले अर्पण करा. यानंतर उदबत्ती व तुपाचा दिवा लावून आरती करावी व कथा वाचावी. उपवासात दिवसभर काहीही खाऊ नका, संध्याकाळी पूजा आणि आरती झाल्यावर फळे खाऊ शकता. या उपवासात अन्न घेता येत नाही. अशा प्रकारे पूजा केल्याने भगवान शिव आणि माता सती यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि वैवाहिक जीवन सुखी राहते.
माता सती ही राजा दक्षाची कन्या होती. राजा दक्षाला भगवान शिव अजिबात आवडले नव्हते, पण तो श्रीहरीचा भक्त होता. जेव्हा माता सतीने आपल्या वडिलांना शिवाशी लग्नाबद्दल सांगितले तेव्हा ते यासाठी तयार नव्हते. सतीने जिद्दीने भगवान शिवाशीच लग्न केले. याचा राग येऊन दक्ष राजाने आपली कन्या सतीशी सर्व संबंध तोडले. राजा दक्षाने एकदा एक मोठा यज्ञ आयोजित केला होता परंतु त्याने आपल्या मुलीला आणि जावयाला आमंत्रित केले नाही. सती माता शिवाला वडिलांच्या घरी जाण्याचा आग्रह करू लागली आणि राजा दक्षाच्या घरी पोहोचली. यादरम्यान दक्षाने आपल्या मुलीचा अपमान केला, तसेच जावई शिवजी यांना अपशब्द वापरले.
यावर संतापलेल्या सतीने यज्ञकुंडात उडी मारून आपला जीव दिला. जेव्हा देवाला हे समजले तेव्हा त्यांनी माता सतीला शाप दिला की तिने आपल्या पतीच्या इच्छेविरुद्ध जसे वागले, त्याच प्रकारे तिला शिवाचा वियोग सहन करावा लागेल. त्यानंतर माता सतीला सुमारे 10 हजार वर्षे जंगलात कोकिळा म्हणून राहावे लागले. यावेळी त्यांनी भोलेनाथाची कोकिळेच्या रूपात पूजा केली. त्यानंतर पर्वतराज हिमालयाच्या घरी तिचा पार्वती म्हणून जन्म झाला आणि तिला पुन्हा पती म्हणून स्वीकारले.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)