मुंबई : जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते. जैन धर्माच्या तज्ज्ञांच्या मते भगवान महावीरांचा (Mahaveer jayanti) जन्म बिहारमधील कुंडलपूरच्या राजघराण्यात ईसापूर्व 599 मध्ये झाला होता. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी राजेशाही थाट सोडून संसाराचा त्याग केला होता आणि या मार्गावर शेवटपर्यंत चालत त्यांनी माणसाला योग्य मार्ग दाखविण्याचे काम केले. जाणून घेऊया या वर्षी महावीर जयंती कधी साजरी होणार, उपासना आणि त्याची मुख्य तत्त्वे?
हिंदू पंचांगानुसार, चैत्र शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 03 एप्रिल रोजी सकाळी 06.24 वाजता सुरू होईल आणि ही तिथी 04 मार्च रोजी सकाळी 08.05 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत मंगळवार, 04 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंती साजरी केली जाणार आहे.
जैन धर्माचे मुख्य तत्व म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आणि भगवान महावीरांनी सुमारे १२ वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला होता. महावीर जयंतीच्या शुभमुहूर्तावर जैन समाजातील लोक प्रभातफेरी, धार्मिक विधी आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. तसेच, या विशेष दिवशी भगवान महावीरांच्या मूर्तीला सोन्याच्या किंवा चांदीच्या कलशातून पाणी अर्पण केले जाते आणि त्यांची शिकवण पूर्ण भक्तिभावाने ऐकली जाते.
भगवान महावीरांनी मानवाच्या उन्नतीसाठी पाच मुख्य तत्त्वे दिली होती, ज्यांना पंचशील सिद्धांत असेही म्हणतात. ती तत्त्वे आहेत- सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. सत्य आणि अहिंसा हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. दुसरीकडे, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, व्यक्तीला आध्यात्मिक शांती आणि मोक्ष प्राप्त होतो. अपरिग्रह म्हणजेच विषय किंवा वस्तूची आसक्ती न राहिल्याने माणूस ऐहिक आकर्षणाचा त्याग करून अध्यात्माच्या मार्गावर अखंड चालतो आणि ब्रह्मचर्य पाळणाऱ्या व्यक्तीला आपल्या इंद्रियांवर सहज नियंत्रण मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)