मृत्यूनंतर माणूस रिकाम्या हाती जात नाही, ‘या’ तीन गोष्टी जातात सोबत; तुम्हाला माहीत आहे?

| Updated on: Oct 31, 2024 | 8:03 PM

जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो. पण जन्म आणि मृत्यू दरम्यानचं जे जगणं आहे. ते आपल्या हातात असतं.

मृत्यूनंतर माणूस रिकाम्या हाती जात नाही, या तीन गोष्टी जातात सोबत; तुम्हाला माहीत आहे?
Follow us on

जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो. पण जन्म आणि मृत्यू दरम्यानचं जे जगणं आहे. ते आपल्या हातात असतं. त्याकाळात आपण कसे जगतो, काय करतो? कसे वागतो? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यालाच अध्यात्मिक जगतात कर्म म्हणतात. कुशल आणि अकूशल कर्म असे कर्माचे दोन प्रकार आहेत. मृत्यूनंतर हेच कर्म आपल्यासोबत जातात. सर्व काही मागं राहतं. धन, संपत्ती, नातेवाईक, घरदार, कपडेलत्ते, थाटमाट हे सर्व काही मागे राहतं. सोबत फक्त आपली कर्म जातात. पण तरीही मृत्यूनंतर कोणत्या तीन गोष्टी मनुष्यसोबत घेऊन जातो हा प्रश्न मनात येतोच. त्या तीन गोष्टींची माहितीच आम्ही तुम्हाला देणार आहोत.

मृत्यूनंतर काय होतं? मृत्यूनंतर मनुष्य कुठे जातो? असा सवाल नेहमी केला जातो. त्यावर अनेक संशोधनेही झाली. पण त्याचा पत्ता आजवर कुणालाच लागलेला नाही. मृत्यूनंतर मनुष्य खाली हात जातो असं नेहमी सांगितलं जातं. पण वास्तवात तसं नाहीये. मृत्यूनंतर मनुष्य तीन महत्त्वाच्या गोष्टी सोबत घेऊन जातो.

कर्म

कर्माशिवाय मनुष्य एक क्षणही राहू शकत नाही, असं गीतेत म्हटलं आहे. जेव्हा मृत्यूची वेळ येतो तेव्हा आत्मा आपण केलेले सर्व कर्माच्या स्मृती एकत्र करते. परलोकात व्यक्ती सुखी राहील की दुखी हे या कर्मावरूनच ठरतं, अशी समजूत आहे. जर व्यक्तीने त्याच्या आयुष्यात सकारात्मक आणि नैतिक कर्म केले असतील तर त्याला स्वर्ग सुखाचा अनुभव होईल. तर नकारात्मक कर्माचे परिणाम पुढील जन्मात वाईटच फळ देतात.

कर्ज

गरुड पुराणाच्या मते, व्यक्तीकडून घेण्यात आलेलं कोणतंही कर्ज जन्मोजन्मापर्यंत पाठलाग सोडत नाही. त्यामुळेच मृत्यूच्या आधी कर्ज फेडलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा एखादा व्यक्ती कर्ज घेऊन मरतो तेव्हा यमराज कर्जदात्याचा हिशोब करतो. याचा अर्थ पुढच्या जन्मात तुम्हाला त्याचा कर्ज फेडावं लागेल. त्यामुळे आयुष्यात आर्थिक जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे.

पुण्य

दान, दया आणि परोपकाराचं पुण्य अनेक जन्म आपल्यासोबत राहातं. तुम्ही केलेलं पुण्यच ठरवत की तुम्ही स्वर्गात जाणार आहात की नरकामध्ये. जेव्हा एखादा व्यक्ती आयुष्यात फार काही काम न करताही आपलं आयुष्य सुख,समाधानात व्यतीत करतो तेव्हा त्याला त्याने केलेलं मागच्या आयुष्यातील पुण्य मानलं जातं. दान, दया आणि परोपकारामुळे तुम्हाला केवळ पुण्यच मिळत नाही तर तुमच्या आयुष्यात शांती, समाधान देखील मिळते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)