मुंबई : हिंदू धर्मानुसार वैशाख शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचे (Mohini Ekadashi 2023) व्रत पाळण्यात येते. यावेळी मोहिनी एकादशीचे व्रत 01 मे 2023 रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते, अशी धार्मिक मान्यता आहे. या व्रताबद्दल अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णूने राक्षसांचा नाश करण्यासाठी मोहिनीचे रूप धारण केले होते. मोहिनी हा भगवान श्री हरीचा एकमेव स्त्री अवतार आहे. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या व्रताबद्दल पुराणात सांगितले आहे की, जेव्हा देव आणि असुर यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून अमृताचा कलश प्राप्त झाला.
देव आणि दानव दोघांनाही अमृत प्यायचे होते, यावरून देव आणि दानवांमध्ये अमृत मिळण्यावरून वाद झाला. हा वाद संपवण्यासाठी भगवान विष्णूंनी एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले. ज्या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले, तो दिवस होता वैशाख महिन्यातील शुक्ल एकादशी. या दिवशी विष्णूजींनी मोहिनीचे रूप धारण केले होते, म्हणून हा दिवस मोहिनी एकादशी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)