मुंबई : दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. पंचांगानुसार, सूर्योदयापूर्वी चतुर्दशी तिथी असते आणि सूर्यास्तानंतर अमावस्या तिथी असते तेव्हा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजा एकाच दिवशी केली जाते. यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकाच दिवशी आले आहे. म्हणजेच उद्या 12 नोव्हेंबरला, रविवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अभ्यंग स्नान (abhyanga snan 2023) केले जाते. जोतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया अभ्यंग स्नानाचे महत्त्व.
नरक चतुर्दशीचा दिवस मृत्यूची देवता यमराजाला समर्पित मानला जातो. या दिवशी अभ्यंगस्नान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, जे लोकं या विशेष दिवशी अभ्यंग स्नान करतात ते नरकात जाणे टाळू शकतात तसेच त्याना मृत्यू पश्चात स्वर्ग प्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता आहे. अभ्यंगस्नान हे केवळ धार्मिक दृष्टीकोनातूनच महत्त्वाचे नाही तर त्यामुळे अनेक शारीरिक फायदेही होतात.
कार्तिक महिन्याची चतुर्दशी तिथी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 01:57 वाजता सुरू होत आहे. तसेच, 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 02:44 वाजता संपेल. अशा स्थितीत उदय तिथीनुसार अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त 12 नोव्हेंबर रोजी पहाटे 5:28 ते 6:41 पर्यंत असेल. तसेच या दिवशी चंद्रोदय पहाटे 5.28 वाजता होईल.
नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तिळाच्या तेलाने अंगावर मसाज करा. यानंतर काही वेळ बसा. यानंतर अंगावर उबटान लावा. हळद, चंदन पावडर, तीळ पावडर आणि दही मिसळून हे उटणं तयार केले जाते. ते शरीरावर नीट चोळल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा. स्नान झाल्यानंत देवघर स्वच्छ करा. देवाजवळ दिवा लावा. देवाची पूजा केल्यानंतर गरातल्या वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद घ्या. त्यानंतर सूर्याला अर्घ्य देवून लाल फुल वाहावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)