मुंबई : 17 ऑक्टोबर 2023 | दुर्गेचे चौथे रूप म्हणजे देवी कुष्मांडा. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. ही सृष्टीची आद्यशक्ती आहे. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज या देवीच्या कृपेमुळेच आहे. कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा तिच्या अष्टभुजात सामावले आहे. आठव्या हातात जपमाळा त्यामुळे ही अष्टभुजा नावाने देखील प्रसिद्ध आहे. या दिवशी साधकाचे मत अदाहत चक्रात स्थिर झालेले असते. अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडादेवीला समोर ठेवून पूजा उपासना करावी. नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचा मान निळ्या रंगाला देण्यात आलाय.
अखिल जगताचा मनभावन असा हा निळा रंग. सगळ्यांत आवडता. वर पसरलेले निळसर शुभ्र आकाश आणि ७१ टक्के निळसर पाण्याने व्यापलेली भूमी. दोन्हीही निळेच. मन आणि शरीराला शीतल करणारी निसर्गातली ही निळी उधळण. प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, आदर्शता याचा हा रंग. उत्तम संवाद, विचारांची देवाण-घेवाण, मनमोकळेपणा, विचारांची सुसूत्रता या रंगात आहे. म्हणूनच या रंगाची टॅगलाईन आहे, ‘आय स्पीक, आय अॅम हर्ड’.
पिंक फॉर गर्ल्स अँड ब्ल्यू फॉर बॉईज असं म्हणतात. पण, फक्त मुलांनाच नाही तर मुलींवर देखील निळ्या रंगछटेचे कपडे अधिक खुलून दिसतात. कान्हाचाही रंग निळाच. त्यामुळे या रंगाला आध्यात्मिक वैभव लाभलेय. आपल्या समजाच्या, जाणीवांच्या पलिकडचे जे आहे त्याचा रंग निळा. मग ते अथांग आकाश असेल नाही तर अथांग सागर, अथवा अनादी अनंत परमेश.
सर्वांना आपलं म्हणणारा, सामावून घेणारा. या रंगाची मानसिकता अशी की हा रंग तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक सकारात्मकरित्या लोकांसमोर आणतो. मुलाखतीला जाताना किंवा आपल्या क्लाएंटला भेटायला जाताना निळ्या रंगसंगतीचे कपडे घालावे असे एका रिसर्च मध्ये म्हटलंय. तुम्ही खूपच प्रामाणिक आणि खरे आहात असे हा रंग दर्शवतो.
आद्य परमेशाचा, समस्त मातांचा, मनमोहक, समुपदेशक, मनात अथांग प्रेमाचा ठेवा. इथे माता म्हणजे मातृभाव अपेक्षित आहे. मग ती काळ्या रात्रीत उभा कडा उतरुन जाणारी हिरकणी असेल वा आपल्या कच्याबच्यांना दोन घास पोटाला मिळावेत म्हणून उन्हातान्हात शेतात राबणारी माय असेल.
रश्मी पांढरे ( लेखिका निर्मात्या आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)