मुंबई : 14 ऑक्टोबर 2023 | रविवार 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्र उत्सवाला (Navratri2023) सुरवात होत आहे. पुढील नऊ दिवस भाविक तल्लीन होऊन देवीची पूजा अर्चा ध्यान धारणा करणार. या नऊ दिवसात देवीला नऊ माळा अपर्ण केल्या जातात. कोणत्या देवीसाठी कोणत्या दिवशी आराधन करावी आणि कोणत्या रंगाचे वस्त्र धारण करावे याची नेमकी माहिती नसते. चला तर मग जाणून घेऊ नवरात्रमधील नऊ देवींचे आणि नऊ रंगाचे महात्म. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.
नवदुर्गापैकी दुर्गेचे पहिले रूप ‘शैलपुत्री’ या नावाने ओळखले जाते. शैलपुत्री दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे. पर्वतांचा राजा हिमालय यांची मुलगी म्हणून तिने जन्म घेतला. त्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ‘शैलपुत्री’ हिची पूजा, आराधना केली जाते. या दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला पमूलाधारचक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते.
नवरात्रीचा पहिला रंग केशरी आहे. सुर्याची सकाळची किरणे जशी तेजोमय असतात तसा हा तेजोमयी रंग. दैवी शक्तींचे प्रतिनिधित्व करणारा. नकारात्मकतेचा नाश करणारा, अंधार नाहीसा करणाऱ्या तेजाचा केशरी रंग! लाल आणि पिवळ्या रंग एकत्र केल्यास त्याच्या संयोगाने बनणारा हा केशरी. म्हणूच तो शक्ती, उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे.
लाल रंग याचा चांगला गुण भगव्यामध्ये दिसतो तो म्हणजे भूक वाढवण्याचा. लाल रंगाचा आक्रमकपणा भगव्या रंगात नसतो. पिवळ्या रंगासारखाच हा आशावादी रंग आहे. स्वत:वर प्रचंड विश्वास, सकारात्मक दृष्टिकोन असा हा भगवा म्हणजेच केशरी हा तरुणाईचा आवडता रंग.
संवाद वाढविणे. चर्चा घडविणे आणि नव्या कल्पनांची जोड देणारा भगवा. अतिशय पवित्र असा हा भगवा. उत्साहदायी, दु:खातून बाहेर काढण्याची शक्ती देणारा, मानसिक आजाराला दुर करून सकारात्मक परिणाम देणारा भगवा. पराक्रमाचा तसाच त्यागाचाही रंग. भारतीय राष्ट्र ध्वजात मानाचे स्थान असलेला भगवा!
विवेकानंदाच्या पेहराव्याचा! सगळ्या स्त्री शक्तीचा! राणी लक्ष्मीबाईं ते कस्तुरबा गांधी, कमला नेहरू अशा असंख्य स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्यांचा रंग, अशक्य परिस्थितीतून भरारी घेणाऱ्यांचा, अशक्य आहे ते शक्य करून दाखविण्याची जिद्द बाळगणाऱ्याचा रंग, पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या जरिपटक्याचा भगवा. या भगव्याला त्रिवार मुजरा…
रश्मी पांढरे ( लेखिका निर्मात्या आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)