मुंबई : देवीच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. यानंतर सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरू होईल. नवरात्रीचे (Navratri 2023) संपूर्ण नऊ दिवस विधीपूर्वक दुर्गादेवीची पूजा केल्याने भक्तांची प्रत्येक अपूर्ण इच्छा पूर्ण होते. देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध ठिकाणी भंडारा, जागरणाचे आयोजन केले जाते. अनेक ठिकाणी भव्य देखाव्यांसह देवीची स्थापना केली जाते. यावेळी नवरात्र खूप खास आहे. यंदा देवी गजारूढ होऊन येणार आहे. म्हजेच यंदा देवीचे वाहन हत्ती असणार आहे. दुसरीकडे यंदा नवरात्रीमध्ये 3 दुर्मिळ योगायोग घडणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया हा योग का शुभ मानला जातो.
रविवार, 15 ऑक्टोबर 2023 पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. पहिल्या दिवशी कलशाच्या स्थापनेसह शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. यंदा नवरात्री 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. 24 ऑक्टोबरला दसराही साजरा होणार आहे. घटस्थापना म्हणजेच कलश स्थापनेला नवरात्रीमध्ये विशेष महत्त्व आहे. नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी कन्याभोजाचे आयोजनही केले जाते. असे म्हणतात की, कुमारीकांना भोजनदान केल्याने देवी सर्व मनोकामना पूर्ण करते.
या वर्षी नवरात्रीची सुरुवात शशा राजयोग, भद्रा राजयोग आणि बुधादित्य योगाने होईल. 30 वर्षांनंतर या तिन्ही योगांचा संयोग होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या योगात माता राणीचे पूजन केल्याने लोकांना धन, वैभव, सुख, समृद्धी आणि प्रगतीचा लाभ होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)