मुंबई : शक्तीस्वरूप माता दुर्गेच्या महाउत्सवाला 5 दिवस झाले आहेत. या वर्षी शारदीय नवरात्रीची (Navratri 2023) सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 पासून होईल आणि 23 ऑक्टोबरला संपेल. नवरात्रीत पूर्ण 9 दिवस उपासनेसह उपवास केला जातो. वास्तविक, नवरात्र हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘9 रात्री’ असा होतो. या 9 रात्री आणि 10 दिवसांमध्ये भक्त शक्तीचे स्वरूप असलेल्या दूर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा करतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशस्थापना किंवा घटस्थापना सुरू होते. या दरम्यान नारळ ठेवून कलशस्थापना किंवा घटस्थापना केली जाते. पण, तुम्हाला माहीत आहे का नवरात्रीनंतर या नारळाचे काय करावे? ज्यामुळे देवीचा आशिर्वाद कायम आपल्यासोबत राहिल
ज्योतिषशास्त्रानुसार कलश ज्या श्रद्धेने स्थापित केला जातो त्याच श्रद्धेने विसर्जन आवश्यक आहे. जर तुम्ही नारळ काढले किंवा चुकीच्या पद्धतीने वापरले तर त्याचा अपमान होतो आणि नवरात्रीमध्ये केलेल्या पूजा आणि उपवासाचे फळ मिळत नाही. जाणून घेऊया नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?
पूजेच्या ठिकाणी ठेवा : नवरात्रीमध्ये स्थापित केलेल्या नारळांकडे दुर्लक्ष करू नये. कारण, नवरात्र संपल्यानंतर अनेकजण चुकीच्या पद्धतीने वापर करतात. असे केल्याने त्यांना 9 दिवसांच्या उपासनेचे फळ मिळत नाही. कलशावर ठेवलेल्या नारळावर देवीचा विशेष आशीर्वाद असतो. अशा स्थितीत नवरात्रीनंतर हा नारळ लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून पूजेच्या ठिकाणी ठेवावा. असे केल्याने देवी प्रसन्न होते आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात.
प्रसाद म्हणून खाणे : नवरात्रीमध्ये कलशावर ठेवलेला नारळ 9 दिवसांनी विधीनुसार काढून टाकावा. यानंतर तुम्ही ते नदी किंवा वाहत्या पाण्यात विसर्जीत करू शकता किंवा प्रसाद म्हणून वाटून स्वतः देखील खाऊ शकता. असे केल्याने तुम्हाला देवीकडून सुख आणि समृद्धीचा आशिर्वाद प्राप्त होईल.
तांदूळही विसर्जीत करा : हिंदू धर्मात पूजा झाल्यानंतर पूजा साहित्य पाण्यात विसर्जीत करणे उत्तम मानले जाते. कलशाखाली ठेवलेला नारळ असो वा तांदूळ. नवरात्रीनंतर सर्व काही पाण्यात विसर्जित केले पाहिजे. वास्तविक, असे केल्याने कोणताही दोष लागत नाही आणि पूजेचे पूर्ण फळ मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)