नाशिक : नवरात्र उत्सवात (Navratr) अनेक जण हे उपवास (Fast) करतात. त्यात वेगवेगळे उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. याच काळात विविध दुकानांमध्ये उपवासाचे पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले असतात. अशावेळी उपवासाचे पदार्थ (Food) हे खात्री करूनच घ्या. अन्यथा तुमच्या जिवावर बेतू शकते. नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसुल येथे भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आहे. यामध्ये चाळीसहून अधिक व्यक्तींना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने याबाबत दखल घेतली असून विक्री केलेल्या दुकानातून उर्वरित भगर जप्त केली असून पुढील तपास केला जात आहे. भगरीमुळे अनेकांचे जीव धोक्यात आले असून विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात असून रुग्णालये फुल्ल झाले आहेत.
नवरात्र उत्सवाला सुरुवात झाल्याने अनेक जण या काळात उपवास करत असतात, त्यादरम्यान उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी असते.
नवरात्र उत्सव काळात उपवास करण्यात महिलांची संख्या मोठी असते, त्यामुळे विषबाधा झालेल्या संख्येत महिला जास्त असल्याची माहिती समोर येत आहेत.
यामध्ये भगर खाल्ल्याने अनेकांना उलट्या होऊ लागल्या असून पोटात जळजळ होत आहे, तर काहींना थरकाप भरला आहे.
येवला तालुक्यातील रास्ते सुरेगाव, अंदरसूल, भुलेगाव, अंगुलगाव, देवळाणे, पिंपळखुटे आणि देवठाण या गावामध्ये भगर शिजवून खाल्ल्याने विषबाधा झाली आहे.
अंदरसुल येथील दवाखाने फुल्ल झाले असून अनेक रुग्णांना येवला येथे पुढील उपचारासाठी पाठविले जात आहे. उपवास करणाऱ्यांनी भगर खाणे टाळावे असे आवाहन केले जात आहे.
अंदरसूल येथील डॉ. जैन, डॉ. जाधव आणि डॉ. तुषार भागवत हे डॉक्टर उपचार करीत असून अन्न औषध प्रशासनाने भगर उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असून पुढील कार्यवाही केली जात आहे.