मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : दुर्गामातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे म्हणूच तिला महागौरी म्हटले जाते. गोऱ्या रंगाची उपमा शंख, चंद्र आणि कुंबाचे याप्सून दिली आहे. महागौरी हिचे वय आठ वर्ष मानले जाते. देवीचे वस्त्र आणि आभूषण श्वेत रंगाची आहेत. हिला चार भुजा आहेत. उजव्या हातात अभयमुद्रा आणि त्रिशूळ तर डाव्या हातात डमरू आणि वर मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे. या देवीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप, संताप, दुःख कधीही येत नाही.
नवरात्रीमध्ये अष्टमीला विशेष महत्व आहे. सगळीकडे वातावरण आनंदी असते. यामुळेच हळूवार प्रीतीचा रंग असलेल्या गुलाबी रंगाची वस्त्रे या दिवशी परिधान करतात. गुलाबी भावनांचा, प्रणयाचा, एकमेकांप्रती असलेल्या ओढीचा, काळजीचा आणि निरपेक्ष समर्पणाचा हा गुलाबी रंग. हा रंग स्त्रीच्या कोमलतेशी जोडला गेला आहे.
सकारात्मकतेचा, आशेचा, उबदार सेवा भावनेचा असा हा रंग आहे. जीवनात आश्वासन देणारा, आरोग्यदायी मानला जाणारा, सगळं काही ठिक होईल असा आशादायी असा गुलाबी. स्त्री चा प्रेमातल्या निरपेक्ष समर्पणाचा रंग. मग, तिचं ते प्रेम प्रिया प्रती असेल नाही तर आपल्या समाजसेवी कार्याप्रती.
अशक्य आशावादी असलेली हेलन केलर, विधवांना आणि त्यांच्या मुलांना सन्मानाचे आयुष्य देणाऱ्या आद्य शिक्षिका आणि समाजसेविका सावित्रीबाई फुले, अनी बेझंट, सेवासदन संस्थापक रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई सरस्वती, त्यागमूर्ती मदर तेरेसा ते नर्मदा आंदोलनाच्या मेधा पाटकर. दुसऱ्याच्या विकासासाठी निरपेक्षपणे झटणाऱ्या या स्त्रिया. हा रंग त्यांच्या निरपेक्षपणाला समर्पित. अखंड सेवाव्रती माणसे या सगळ्यांचा आहे हा गुलाबी रंग! चराचराप्रती, मानवतेप्रती असलेल्या या सर्वांच्या निखळ प्रेम भावनेचा हा गुलाबी रंग.