मुंबई : 16 ऑक्टोबर 2023 | नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गेची तिसरी शक्ती चंद्रघंटा या देवीची पूजा केली जाते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो. विविध प्रकारचे दिव्य आवाज ऐकायला येतात. साधकासाठी हे क्षण अत्यंत महत्वाचे असतात. या दिवशी साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते. शांतीदायक आणि कल्याणकारी अशी ही देवी सर्व संकटांचे निवारण करते. मस्तकावर घंटेचा आकार असणारा अर्धचंद्र असल्यामुळे हिला चंद्रघंटा देवी म्हणतात.
चंद्रघंटा देवीला दहा हात आहेत. खड्ग, धनुष्यबाण ही तिची शस्त्रे आहेत. तर वाहन सिंह आहे. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. नेहमी युद्धासाठी तयार अशी हिची मुद्रा आहे. चंद्राघंटा देवीच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर होतात. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. हा लाल रंग वैयक्तिक आयुष्य ते व्यवसायिक आयुष्यापर्यंत सर्वात जास्त प्रभाव टाकणारा रंग आहे. सगळ्यात जास्त आकर्षक मानला गेलेला रंग आहे.
भारतात आणि बऱ्याचशा पूर्व आशियाई देशात लाल रंगाला खूप महत्त्व आहे. लग्नकार्यात वधूची साडी, कपाळावरचे कुंकू, शेला, तोरणे यांचा हा रंग. सर्वांचे लक्ष लवकर वेधून घेणारा हा रंग. धोका दर्शवण्यासाठी जगभरात हा प्रमाणित आहे. लाल रंगाची जे निवड करतात ते अधिक आशादायी आणि कार्यक्षम असतात.
उत्साह, क्रिया, इच्छाशक्ती याचे हा रंग प्रतीक आहे. शक्ती, युद्ध आणि धोका यांना सूचित करणारा, लाल रंग आकर्षित करून घेणारा आहे. लाल रंगामुळे पचनक्रिया आणि श्वसन सुधारते तर रक्तदाब वाढतो. ‘मी, माझे’ या भोवतीच घुटमळणारा रंग असे याचे वर्ण करता येईल. याच्या प्रभावाखाली बाकीचे रंग एकदमच नगण्य होतात.
एखाद्या मिटिंगमध्ये स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, कोणासमोर भाषण देताना हा रंग सर्वाचे लक्ष तुमच्यावर केंद्रित करायला मदत करतो. लाल रंग शारीरिक ऊर्जेशी जोडला गेला आहे. या रंगामुळे स्वत:ची शारीरिक ऊर्जा वाढते पण समोरच्याची कार्यक्षमता आणि विचार करण्याची कुवत घटते. वेगाचा, आक्रमकतेचा, स्त्री-पुरुषातील आकर्षणाचा रंग आहे. स्त्रियांच्या आयुष्यात याचे विशेष महत्व. दर महिन्याला स्त्रीच्या शरीरात जो सृजनाचा उत्सव साजरा होतो त्या शरीरधर्माचा, स्त्रीत्वाचा हा रंग. एखाद्या कळीचा जन्माला येण्याचा अधिकार जेव्हा नाकारला जातो, त्याचा हा लाल रंग.