मुंबई : 15 ऑक्टोबर 2023 | नवशक्तीपैकी ब्रम्हचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हचारिणी ही शांत स्वभावाची. तिने शुभ्र वस्त्र धारण केले आहे. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि दिव्य आहे. उजव्या हातात जप माळा आणि डाव्या हातात कमंडलू असे हिचे स्वरूप आहे. तपाचे आचरण करणारी म्हणजे ब्रम्हाचारिणी. चंद्राला सफेद अर्थात पांढऱ्या रंगाचे वस्त्र जास्त प्रिय आहे. म्हणून नवरात्रीमध्ये सोमवारी पांढऱ्या रंगाच्या वस्त्राला जास्त प्राधान्य दिले जाते.
नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी साधकाचे मन यस्वाधिष्ठान चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला माता ब्रम्हचारिणीची कृपा आणि भक्ती प्राप्त होते. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. हिची उपासना केल्याने तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते.
ब्रम्हचारिणी मातेला शुभ्र अर्थात पांढरा रंग अतिप्रिय आहे. हा रंग चंद्रालाही प्रिय आहे. माता ब्रम्हचारिणी आणि चंद्र हे दोन्ही मनाला शांती प्रदान करतात. त्यामुळेच पांढरा रंग शांती, मांगल्य, स्वच्छता, पवित्रतेचा, निरागसतेचा निदर्शक आहे. सेवाभावी वृत्ती आणि समाजकार्याची आवड. संघर्ष टाळणे, सुंसवाद साधणे हे याचे द्योतक आहे.
सफेद रंगाला प्रथम पसंती देणाऱ्या व्यक्ती सकारात्मक असतात. त्यांचा स्वभाव मोकळेपणाच असतो. या व्यक्ती इतरांना समजून घेतात. कालचा दिवस विसरून रोज नव्या उमेदीने संसाराचा गाडा ओढणाऱ्या स्त्रीयांचा हा आवडता रंग.
पांढरी रांगोळी असल्याशिवाय पुर्ण रांगोळी बनत नाही. या रंगात इतर रंग भरले तर त्याची आकर्षकता वाढते. सगळ्या रंगाना एकत्र ठेवायला परत पांढरी रांगोळीचं लागते. आजचे देवीचे रुप ब्रम्हचारिणी! तशाच या स्त्रिया. आजूबाजूच्या सर्वांचा समतोल राखून आपल्या घराचे रंग उठावदार करणारी स्त्री. कोणत्याही प्रकारे संसाराचा भार वाहणारी स्त्री. यात ग्रामीण भागातील शेती, जनावरे, दुध-दुभत, सणवार सांभाळणाऱ्या आणि शहरातील घर, नातेवाईक, पाहुणे, ताळेबंद आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून अनेक आघाड्यावर यशस्वी ठरणारी स्त्री अभिप्रेत आहे. एका अर्थी खरी ब्रम्हचारिणी!