उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडे तीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानी देवीची आज शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भवानी तलवार अलंकार महापूजा करण्यात आली. यावेळी देवीला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेले शिवकालीन दागिने आणि अलंकार घालण्यात आले. त्यात राजा शिव छत्रपती असे अक्षर कोरलेले सोन्याची 108 राजमुद्रा असलेली माळ भवानीला घालण्यात आली.
स्वराज्य स्थापनेसाठी आणि दुष्टांचा संहार करुन प्रजेचे रक्षण करण्यासाठी तुळजाभवानी देवीने छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार आशीर्वाद म्हणून भेट दिली होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आई भवानीचे दर्शन घेताना आणि तलवार घेतानाच देखावा मांडण्यात आला. तुळजाभवानी देवी आणि शिवाजी महाराज यांचे नाते अतुट आहे, भक्तांनी “जय भवानी जय शिवाजी” असा जयघोष करीत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.
तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा –
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानी मातेची सोमवारी (11 ऑक्टोबर) नवरात्र उत्सव निमित्त शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली.
भगवान विष्णू सागरामध्ये शेष शैय्येवरती विश्राम घेत असताना मातेने त्यांच्या नेत्र कमलात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून शुंभ आणि निशुंभ असे दोन दैत्य निर्माण झाले त्यांनी शेष शैय्येवरील भगवान विष्णूवरती आक्रमण केले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तूती करुन श्रीला जागविले आणि विष्णूवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेष देवीला विश्राम करण्यासाठी दिले. त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
देवीच्या अलंकार पूजा –
♦ 9 ऑक्टोबर रोजी रथअलंकार महापूजा
♦ 10 ऑक्टोबर रोजी ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा
♦ 11 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा
♦ 12 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा
♦ 13 ऑक्टोबरला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा
♦ 14 ऑक्टोबर रोजी घटोत्थापन
♦ 15 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सिमोल्लंघन हा विधी होणार आहे.
त्यांनतर 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागीरी पोर्णिमेनंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल अशी माहिती महंत तुकोजी बुवा यांनी दिली.
तुळजाभवानी मंदिरात VIP कल्चरला लगाम, आता संस्थानाकडून नवी नियमावली जारीhttps://t.co/01TupqK3Rt#Tuljapur #tuljabhavanitemple #VIPDarshan #navratri2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 12, 2021
संबंधित बातम्या :
Dussehra 2021: विजयादशमी कधी आहे ? महत्त्व काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Tuljabhavani Mata | तुळजाभवानी मातेच्या मंदिरात छबिना मिरवणूक, पहिल्या माळेची सांगता