तीन वर्षातून एकदाच येते ही एकादशी, व्रताने होतात सर्व मनोकामना पूर्ण

| Updated on: Jul 28, 2023 | 11:47 AM

यंदा ही एकादशी 29 जुलै म्हणजेच उद्या शनिवारी आहे. शास्त्रानुसार कमला एकादशीचे व्रत केल्यास सौभाग्य, संतती आणि सुख प्राप्त होते. भगवान श्रीकृष्णाने या तिथीला सर्वोत्तम तिथी म्हटले आहे.

तीन वर्षातून एकदाच येते ही एकादशी, व्रताने होतात सर्व मनोकामना पूर्ण
एकादशी
Image Credit source: Social media
Follow us on

मुंबई : तीन वर्षातून एकदा म्हणजे अधिक महिन्यात पुरुषोत्तमी एकादशी येते. याच एकादशीला कमला किंवा पद्मणी एकादशी (Padmini Ekadashi) म्हणूनही ओळखले जाते. यंदा ही एकादशी 29 जुलै म्हणजेच उद्या शनिवारी आहे. शास्त्रानुसार कमला एकादशीचे व्रत केल्यास सौभाग्य, संतती आणि सुख प्राप्त होते. भगवान श्रीकृष्णाने या तिथीला सर्वोत्तम तिथी म्हटले आहे. या व्रताचे पालन केल्याने मनुष्याचे सुख, सौभाग्य वाढते आणि भगवान विष्णूसह श्री महालक्ष्मीजींची कृपा प्राप्त होते.

पुरुषोत्तमी एकादशीचे महत्त्व

शास्त्रानुसार पुरुषोत्तमी एकादशीचे व्रत केल्यास सौभाग्य, संतती आणि सुख प्राप्त होते. या दिवशी घरी नामजप केल्याने दुप्पट फायदा होतो तर गोशाळेत शंभर पट,  तुळशीजवळ हजार पट आणि तुळशी जवळ जनार्दनाची पूजा करून जप केल्यास लाख पटीने फलप्राप्ती होते. तसेच जनार्दन, शिव आणि विष्णूच्या परिसरात जप केल्याने कोटीने फळ मिळते.

पुरुषोत्तमी एकादशीची पूजाविधी

या दिवशी सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करावी. पूजेच्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यात एका चैरंगावर सात प्रकारचे धान्य ठेवून त्यावर पाण्याचा कलश ठेवावा आणि आंब्याच्या पानांनी सजवावे. त्यानंतर भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित केल्यानंतर पिवळी फुले, हंगामी फळे, तुळस इत्यादी अर्पण करावे आणि धूप-दीप आणि कापूरने भगवान विष्णूची आरती करावी. या दिवशी विष्णूजी आणि तुळशीच्या मंदिरात दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी हरी भक्तांनी निंदा, कपट, लोभ, द्वेष या भावनांपासून दूर राहून यथाशक्ती विष्णूजींच्या ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा.

हे सुद्धा वाचा

एकादशीची कथा

पौराणिक कथेनुसार, उज्जयिनी नगरात एक ब्राह्मण राहत होता, त्याला पाच पुत्र होते. त्यापैकी सर्वात धाकट्या मुलाचे नाव जयशर्मा होते, जो अधर्मी होऊन पापमार्गाकडे निघून गेला, त्यामुळे त्याचे आई, वडील, भाऊ अत्यंत दुःखी झाले. त्याच्या कूकर्मामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला सोडून दिले. वाईट कामात मग्न असल्याने काही वेळाने आई-वडिलांनीही त्याला घराबाहेर हाकलून दिले. तो जंगलाकडे निघाला आणि फिरत फिरत एके दिवशी तीर्थराज प्रयागला पोहोचला. भुकेने व्याकूळ होऊन त्यांनी त्रिवेणीत स्नान केले आणि जवळच असलेल्या हरिमित्र मुनींच्या आश्रमात पोहोचला. तेथे ब्राह्मणांनी सर्व पापांचा नाश करणाऱ्या, परम पुण्य देणाऱ्या आणि भोग व मोक्ष देणाऱ्या ‘कमला’ एकादशीचा महिमा सांगितला. जयशर्मा यांनीही कमला एकादशीची कथा विधिवत पाळली आणि ऋषींच्या आश्रमात उपवास केला.

मध्यरात्र झाली तेव्हा भगवती श्रीमहालक्ष्मी त्यांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, हे ब्राह्मणपुत्र! कमला एकादशी व्रताचा चांगला परिणाम झाल्यामुळे मी तुमच्यावर खूप प्रसन्न झाले आहे आणि देवाधिदेव श्रीहरीची परवानगी मिळाल्यानंतर मी तुम्हाला वरदान देण्यासाठी आले आहे. जयशर्मा म्हणाले की आई, जर तू माझ्यावर प्रसन्न असेल तर मला ते व्रत सांग, ज्याच्यात ऋषी-मुनी नेहमी गुंतलेले असतात. श्रीमहालक्ष्मी म्हणाल्या – हे ब्राह्मण ! एकादशी व्रताचे माहात्म्य हे श्रोत्यांनी ऐकावे असा सर्वोत्तम विषय आहे, पवित्र गोष्टींमध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे. यामुळे सर्व पापांचा नाश होऊन अक्षय पुण्य प्राप्त होते. जो मनुष्य या एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळतो आणि तिचे माहात्म्य श्रवण करतो, तो सर्व महापापांपासून त्वरित मुक्त होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. तसेच ही एक पौराणिक कथा आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)