संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज भंडीशेगाव (Bhandishegaon) येथे मुक्कामी असणार आहे. वेळापूरहून प्रस्थान केल्यानंतर ठाकूर बुवांच्या समाधीस्थळी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण पार पडेल. दरम्यान गोल रिंगणानंतर आज दुपारच्या सत्रात निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी एकमेकांना भेटतात. या भेटीला ‘बंधू भेट’ सोहळा म्हंटले जाते. त्यानंतर पालखी भंडीशेगांव येथे मुक्कामी जाते. कोरोना संक्रमणानंतर दोन वर्षांनी यंदाची आषाढी एकादशी (Aashadhi ekadashi 2022) पंढरपुरात (Pandharpur) साजरी होत आहे. या सोहळ्यसाठी 15 ते 20 लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांची सुरक्षा ही महत्त्वाची मानल्या जाते. या पार्श्वभूमीवर पंढरपूचे पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. याबद्दल पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम (Viram Kadam) यांनी TV9 मराठीला माहिती दिली. वारकऱ्यांच्या सेवेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस बंदोबस्त आलेला आहे. यामध्ये 250 पोलीस अधिकारी आणि 5 हजार पोलीस अंमलदार होमगार्ड पाचारण करण्यात आले आहे. यामध्ये मंदिर परिसर, नगर प्रदक्षिणा, वाळवंट आणि इतर महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. चोरीच्या घटनांना आला घालण्यासाठी 154 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
याशिवाय वारकऱ्यांच्या वेशात पोलीस कर्मचारी गस्त घालणार आहेत. यामुळे चोरीच्या घटनांना आला घालता येईल. यावेळी पोलीस प्रशासनाकडून 12 माउली स्क्वॉड पंढरपुरात ठेवण्यात येणार आहेत. एका माउली स्क्वॉडमध्ये 10 कर्मचारी असतील. मंदिर परिसरात दर्शन झाल्यानंतर अनेक भाविक तेथेच स्तब्ध उभे राहतात. माउली स्क्वॉडद्वारे मार्ग मोकळा करण्यात येईल, त्यामुळे रांगेतल्या इतर भाविकांना लवकर दर्शन घेता येणे शक्य होईल. महाराष्ट्राचे नवीन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे महापूजेसाठी येणार आहेत या अनुषंगाने विशेष सुरक्षा टाईन्ड मारण्यात येणार आहे. या शिवाय मुख्यमंत्र्यांसोबत येणाऱ्या इतर मंडळींसाठी विशेष बसची व्यवस्था देखील करण्याचा विचार असल्याचे पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.