आम्ही हरिचे सवंगडे । जुने ठायीचे वेडे बागडे ।
हाती धरुनी कडे । पाठीसवे वागविलो ॥१॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही |
नाही जालो काही | एका एक वेगळे ॥धृू॥
वरवंड, दुपारी पावसाने लावलेली हजेरी तसेच सायंकाळी टाळ मृदगांचा गजरात विठुरायाच्या जयघोषात संत तुकाराम महाराज
पालखीचे (tukaram maharaj palkhi) वरवंड नगरीत (Warwand) भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. कोरोनामुळे दोन वर्ष या सोहळ्याला विराम लागला होता त्यामुळे यंदा पालखीच्या दर्शनासाठी वरवंड वासियांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. परंपरेनुसार वरवंडमध्ये पालखी सोहळा दाखल झाला की कायमच पालखी सोहळ्याचे स्वागतासाठी वरून राजाने लावली हजेरी आहे. यामुळे वारकरी आणि ग्रामस्थ सुखावले.
तुकोबांच्या पालखीचे आगमन काल सायंकाळी 6.00 वाजता वरवंड येथे झाले. पालखी येणार असल्यामुळे स्वागतासाठी स्वागत कमानी रांगोळीच्या पायघड्या तसेच पालखी सोहळ्याचा स्वागतासाठी ग्रामस्थांनी घरासमोर रागोळी काढली होती. पालखी नवीन विठ्ठल मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, भगवे झेंडे घेतलेल्या वारकऱ्यांनी मंदिराला रिंगण केल्यानंतर ग्रामस्थांनी पालखी स्वतःचा खांध्यावर उचलून घेऊन मंदिरामध्ये ठेवली. आरतीनंतर नेवैद्य दाखवण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी दर्शन घेतले.
तर दुसरीकडे सासवड येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल जेजुरी येथे दाखल झाली . पालखीचा मुक्काम काल जेजुरीतच होता. सोन्याच्या जेजुरीत भंडाऱ्यासोबत गुलालाचा रंग उधळला गेला. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीने, भक्तांच्या हरीनामाच्या गजराने जेजुरी गड आणि जेजुरी नगरी अवर्णनीय दिसते आहे. दोन वर्षांनंतर माऊलींचा पालखी सोहळा पंढरीला जात असल्याने सोहळ्यात राज्यभरातून लाखो भाविक सहभागी झाले आहेत. नेहमीपेक्षा सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्याने जेजुरीतील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते.