सोलापूर, आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी (sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) सोहळा पुणे आणि सातारा जिल्ह्यातील प्रवास उरकून आज सोलापूर (Solapur) जिल्ह्यात दाखल झाला. साधारणपणे 14 दिवसांचा प्रवास करून हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल होऊन आता पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागत केले. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 9 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाने सुसज्ज व्यवस्था केलेली आहे. वैद्यकीय सुविधेपासून तर पोलीस प्रशासनापर्यंत सर्वच स्थरावर योग्य ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी सोहळा पार पडत असल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. यंदाच्या वारीत विक्रमी वारकरी सहभागी झाल्याने सोहळ्याचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस बंदोबस्त आलेला आहे. यामध्ये 250 पोलीस अधिकारी आणि 5 हजार पोलीस अंमलदार होमगार्ड पाचारण करण्यात आले आहे. यामध्ये मंदिर परिसर, नगर प्रदक्षिणा, वाळवंट आणि इतर महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. चोरीच्या घटनांना आला घालण्यासाठी 154 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.याशिवाय वारकऱ्यांच्या वेशात पोलीस कर्मचारी गस्त घालणार आहेत. यामुळे चोरीच्या घटनांना आला घालता येईल. यावेळी पोलीस प्रशासनाकडून 12 माउली स्क्वॉड पंढरपुरात ठेवण्यात येणार आहेत. एका माउली स्क्वॉडमध्ये 10 कर्मचारी असतील. मंदिर परिसरात दर्शन झाल्यानंतर अनेक भाविक तेथेच स्तब्ध उभे राहतात. माउली स्क्वॉडद्वारे मार्ग मोकळा करण्यात येईल, त्यामुळे रांगेतल्या इतर भाविकांना लवकर दर्शन घेता येणे शक्य होईल. महाराष्ट्राचे नवीन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे महापूजेसाठी येणार आहेत या अनुषंगाने विशेष सुरक्षा तैनाद करण्यात येणार आहे.