बीड, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून आलेल्या संत मुक्ताईच्या पालखीचे (muktai palkhi 2022) आज बीड नगरीत आगमन झाले. या पालखीचे विशेष म्हणजे सर्वात लांबचा प्रवास करून येणारी ही पालखी आहे. याशिवाय मुक्ताईच्या पालखीत मोठ्या संख्येने महिला वारकर-यांचा सहभाग असतो. बीडमधील आजोबा गोविंदपंत यांच दर्शन घेऊन ही पालखी गोविंदपंत यांच्या पालखीसह पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. दोन दिवसांचा मुक्काम केल्यानंतर ही पालखी पंढरपूरला रवाना होणार आहे. दोन वर्ष कोरोनामुळे ही पालखी बीडमध्ये आली नव्हती. यंदा मात्र निर्बंध हटल्याने मोठ्या उत्साहात बीडकरांनी पालखीचे स्वागत केले आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलीआणि संत सोपानकाकांनी समाधी घेतल्यावर सर्वात धाकटी बहीण संत मुक्ताबाई तापीतीरी अंतरध्यान पावल्या. त्यांचे समाधीस्थळ कोथळी-मुक्ताईनगर आणि मेहूण अशा दोन ठिकाणी दाखवले जाते. मुक्ताबाई इतर भावंडांप्रमाणे समाधी न घेता त्या गुप्त झाल्यामुळे या मंदिरांमध्ये
त्यांच्या पादुका वा समाधी नसून मूर्ती आहे. दोन्ही ठिकाणांहून त्यांची पालखी आषाढीसाठी पंढरपूरला जाते.
आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूरला ज्या सात पालख्य़ा शेवटी असतात, त्यात कोथळीतील संत मुक्ताबाई यांची पालखी सहाव्या क्रमांकावर असते. पालखी प्रस्थान ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला होते. कोथळी ते पंढरपूर अंतर साधारण 485 कि.मी. इतके आहे, वरील पंढरपूर गाठण्यासाठी 33-34 दिवस लागतात. कोथळीजवळच मुक्ताईनगरात मुक्ताबाईंचे नवीन मंदिर आहे. कोथळीत प्रस्थान झाल्यावर पहिला विसावा नवीन मुक्ताईनगर मंदिर येथे होतो. बीड येथे पालखीचे जोरात स्वागत होते. बीड येथे मुक्ताबाईंच्या पणजोबांची समाधी आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
आषाढ शुद्ध षष्ठीला पालखी पंढरपुरात पोहोचते. तेव्हा पालखीच्या स्वागतासाठी संत नामदेवांचे वंशज नामदासांची दिंडी येते. आषाढ शुद्ध दशमीला सर्व संतांच्या स्वागतासाठी पालखी वाखरी येथे जाते. एकादशीला चंद्रभागा स्रान व नगरप्रदक्षिणा होते. पोर्णिमेला पालखी काल्यासाठी गोपाळपूरला जाते. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होतो. श्रावण शुद्ध चतुर्थीला पालखी पुन्हा
कोथळीला परत येते.