मुंबई : पापमोचिनी एकादशीचे (Papmochini Ekadashi 2023) महत्त्व सनातन धर्मात सांगितले आहे. विष्णु पुराणानुसार ही एकादशी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येते. या दिवशी भगवान विष्णूच्या चतुर्भुज रूपाची पूजा करून व्रत केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. यासोबतच कुटुंबात सुख-समृद्धी आणि सौभाग्याचा मार्ग मोकळा होतो. आज आम्ही तुम्हाला या एकादशीची तिथी, शुभ मुहूर्त व पूजा पद्धतीबद्दल सांगणार आहोत.
ज्योतिषांच्या मते, यावर्षी पापमोचिनी एकादशीचे व्रत 18 मार्च 2023 रोजी पाळले जाणार आहे. हिंदू पंचांगाबद्दल बोलायचे झाल्यास, पापमोचिनी एकादशी तिथी 17 मार्च 2023 रोजी दुपारी 2:06 वाजता सुरू होईल आणि 18 मार्च 2023 रोजी सकाळी 11:13 वाजता समाप्त होईल. यासाठी तुम्ही 18 मार्च रोजी उपोषण करू शकता.
धार्मिक विद्वानांच्या मते पापमोचिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे कपडे परिधान करावेत. यासोबतच त्या दिवसाचे व्रत सुरू करावे. त्यानंतर घराच्या मंदिरात वेदी करून जव, तांदूळ, गहू, बाजरी, उडीद, मूग आणि हरभरा ठेवावा. यानंतर त्या वेदीवर भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा आणि त्यांना पिवळी फळे, फुले, तुळशीची पाने आणि हंगामी फळे अर्पण करा. नंतर डोळे बंद करून भगवान हरिचा जप करा. पूजा करण्याबरोबरच त्यांच्यासमोर आरती करावी.
हिंदू कॅलेंडरनुसार वर्षातील प्रत्येक महिन्यात एकादशी असते. यंदाची ही शेवटची एकादशी आहे. यासह हिंदू कॅलेंडर संपते आणि नवीन वर्ष सुरू होते. या पापमोचिनी एकादशीचे व्रत केल्याने जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. हे व्रत केल्याने माणसाचे शरीर आणि मन शुद्ध होते आणि मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते. पापमोचिनी एकादशीचे व्रत केल्याने सात जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)