मुंबई, सध्या पितृपक्ष (Pitru Paksha 2022) पंधरवडा सुरु आहे. या काळात आपल्या पूर्वजांना स्मरण करून त्यांच्या नावाने पिंडदान (Pindadan) करण्याला विशेष महत्त्व आहे. पिंडदान आणि श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते व जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्यांची सुटका होते अशी मान्यता आहे. हे पिंडदान विशेष ठिकाणी केल्यास अधिक पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. भारतात काही तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी पिंडदान करण्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल.
हिंदू आणि बौद्ध धर्मियांसाठी गया हे श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. पूर्वजांच्या आत्म्याला शांतता मिळावी, यासाठी देशभरात अनेक ठिकाणी श्राद्ध विधी करण्यात येतात. मात्र, गया येथे केलेल्या श्राद्ध विधीमुळे अधिक पुण्य प्राप्त होते. पूर्वजांची जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते, अशी मान्यता आहे. केवळ देशातील नाही, तर विदेशातूनही अनेक श्रद्धाळू गया येथे श्राद्ध विधी करण्यासाठी येतात.
पिंडदान हा काशीमधील प्रसिद्ध विधी आहे आणि तो आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त करण्याचा महत्त्वाचा विधी असल्याचे मानले जाते. गया आणि वाराणसी येथील पिंड दान हे सर्व हिंदू अनुयायांसाठी महत्त्वाचे मानले जाते आणि मृत आत्म्यांना मोक्ष मिळवून देण्यासाठी गया किंवा काशी येथील पिंडदान योग्य ब्राह्मणांसोबतच केले पाहिजे. पितरांचा आशीर्वाद आणि पिंडदान केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वीपणे करता येत नाही, असे मानले जाते. वाराणसी हे भारतातील प्राचीन शहरांपैकी एक आहे आणि हिंदू धर्मात या तीर्थक्षेत्राला विशेष महत्त्व आहे.
रामजन्मभूमी हे तीर्थक्षेत्र देखील आहे आणि पिंडदान विधीसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. पवित्र सरयू नदीच्या काठावर भाट कुंड आहे जेथे लोक ब्राह्मण पुजाऱ्यांच्या हातून धार्मिक विधी पार पाडतात. अनेकजण आपल्या पूर्वजांसाठी येथे हवन देखील करतात. शरयू नदीत स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. तसेच पिंडदानासोबतच येथे अन्नदान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. अयोध्येत पर्यटकांना पाहण्यासारखे बरेच काही आहे, त्यातील काही प्रमुख म्हणजे फैजाबाद, बिथूर, जौनपूर, वाराणसी, प्रतापगढ आणि बस्ती या ठिकाणांना भाविक नक्कीच भेट देतात.
मध्य प्रदेशातील उज्जैन हे मंदिरांचे शहर आहे आणि पिंडदान विधीसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. शहरातून वाहणाऱ्या शिप्रा नदीच्या काठावर पिंडदानाचे आयोजन केले जाते, येथे नदीच्या काठावर पिंडदान करणे अत्यंत पुण्याचे मानले जाते. उज्जैनमधील असंख्य तीर्थक्षेत्रांव्यतिरिक्त, कालिदास अकादमी आणि भर्त्रीहरी लेणी यांसारखी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. उज्जैनमधील पर्यटक ओंकारेश्वर, बसवारा, भोपाळ आणि चित्तोडगडसह जवळपासच्या ठिकाणांना भेट देतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)