पितृपक्ष
Image Credit source: Social Media
Pitru paksha 2022: यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू होत असून 25 सप्टेंबर रोजी समाप्त होईल. पितृ पक्षाच्या काळात लोकं त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्या नावाने पिंडदान (Pindadan) व अन्नदान करतात. त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. हिंदू धर्मात श्राद्धाला विशेष महत्त्व आहे. श्राद्ध (Shradha) म्हणजे श्रद्धाभावाने केलेला विधी, ज्यामुळे पितरांना समाधान मिळते. असे म्हटले जाते की पितृ पक्षादरम्यान, सर्व पूर्वज पृथ्वीच्या आवरणात राहतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. पितृ पक्षादरम्यान, पूर्वज त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी श्राद्ध, दान किंवा पिंडदान इत्यादी करण्याची अपेक्षा करतात, कारण यामुळे ते संतुष्ट होतात. तृप्त झाल्यावर मुलांना आशीर्वाद देऊन ते आपल्या जगात परत जातात. परंतु असे अनेक नियम आहेत, जे पितृ पक्षात पाळणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया पितृ पक्षात काय करावे आणि काय करू नये.
पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या गोष्टी करा
- धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षात पितरांचे स्मरण केले पाहिजे. तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना पिंडंदान केले तर ब्रह्मचर्य नियमांचे पालन करा.
- पितरांचे स्मरण करताना काळे तीळ, फुलं, दूध आणि जव पाण्यात मिसळून पितरांना स्मरण करून अर्पण करावे. दर्भाच्या वापर केल्याने पितर लवकर तृप्त होतात असे मानले जाते. पितृ पक्षात दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो.
- धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षाच्या विशेष तिथीला पितरांसाठी अन्नाचे पान ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्या. हिंदू धर्मात असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पितरांपर्यंत पोहोचते.
या गोष्टी टाळाव्या
- धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये. यामुळे पितरांचा प्रकोप होतो. तसेच पितृ पक्षाच्या काळात आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये. यामुळे पितृदोष निर्माण होऊ शकतो.
- पितृ पक्षाच्या काळात मुंडन, मुंज, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी कोणतेही धार्मिक किंवा मंगल कार्य करू नये. असे मानले जाते की पितृ पक्षात शुभ कार्य केल्याने शुभ फळ मिळत नाही.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)