मुंबई, भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत (Pradosh Vrat) पाळले जाते. या व्रताची शिवभक्त वाट पाहत असतात. प्रदोष व्रताबद्दल असे म्हटले जाते की, जे लोकं हे व्रत भक्ती भावाने करतात त्यांना भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. शास्त्रात प्रदोष व्रताचे तपशीलवार वर्णन केले आहे. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. हे व्रत केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. भगवान शिव सर्व प्रकारच्या संकटांचा नाश करणारे आहेत असे म्हटले जाते. त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. त्रयोदशी तिथी ही भगवान शंकराची आवडती तिथी आहे. असे मानले जाते की त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात भगवान शंकराला जल अर्पण केल्याने होतात.
पंचांगानुसार, यावेळी धनत्रयोदशीच्या सणाच्या अगदी एक दिवस आधी, 22 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदोष व्रत येत आहे. हा दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. या दिवशी सायंकाळी 6.05 वाजता त्रयोदशी तिथी सुरू होईल.
22 ऑक्टोबर 2022 रोजी पंचांगानुसार प्रदोष काळाची वेळ शनिवारी संध्याकाळी 6.02 ते 8.17 पर्यंत असेल. सूर्यास्तानंतर प्रदोष काळ सुरू होतो. या वेळेत भगवान शिवाची आराधना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
प्रदोष व्रताचा त्या दिवसाच्या नावाशी विशेष संबंध आहे, म्हणूनच जेव्हा त्रयोदशी तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष म्हणतात. त्याचप्रमाणे मंगळवारी जेव्हा प्रदोष येतो तेव्हा त्याला भौम प्रदोष आणि शनिवारी पडल्यास त्याला शनि प्रदोष व्रत म्हणतात. तसेच शुक्रवारी प्रदोष व्रत आल्यास शुक्र प्रदोष म्हणतात.
या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्यासोबतच शनिदेवाची उपासनाही खूप फलदायी मानली जाते. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. शनि हा भगवान शिवाचा परम भक्त असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी शनिदेवांसमोर शिवाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.