प्रेमानंद महाराज यांचे देशभरात भक्त आहेत. अनेक गोष्टींच्याबाबतीत ते भक्तांना मार्गदर्शन करत असतात. असाच एक सल्ला त्यांनी दिला आहे तो देवी-देवतांच्या फोटोंबाबत. आजकल असा एक ट्रेंड निघाला आहे काहीजण विशेषत: महिलांच्या साड्या, बॅग, ब्लाऊज तसेच ड्रेस, किंवा ओढणी यांवर देवी-देवतांचे फोटो असतात. सध्या लग्नात तर नवरीच्या ब्लाउजवर देवीच्या चेहऱ्याची किंवा पूर्ण मूर्तीची कलाकृती केलेली पाहायला मिळते.
देवी देवतांची प्रतिमा छापण्याचा ट्रेंड
एवढच नाही तर व्यावसायिक कार्डवर, लग्नपत्रिकेवर तसेच फोल्डरवर देवी देवतांचे फोटो छापतात. इतकेच नव्हे तर अगदी टीशर्टस, साड्या तसेच ब्लाऊजवर देखील देवी देवतांची प्रतिमा छापण्याचा एक ट्रेंड सुरू झाला आहे. पण अशाप्रकारे देवांच्या फोटोंचा वापर करणे चांगलं नसल्याचं प्रेमानंद महाराज यांनी एका प्रवचन दरम्यान सांगितले आहे.
देवाच्या प्रतिमेची देखील विटंबना होण्याची शक्यता
आजकाल देवी देवतांचे फोटो पिशव्या, विविध बॅग्स आणि कपड्यांवर छापलेले आपण पाहतो. या सर्व वस्तू जेव्हा आपण हाताळतो तेव्हा अनेकदा त्या कुठेही ठेवल्या आणि टाकल्या जातात. त्यामुळे त्या वस्तूंवर असलेल्या देवाच्या प्रतिमेची देखील विटंबना होण्याची शक्यता असते. म्हणून काही लोकं देवाच्या फोटोचा वापर कुठेही करणे चुकीचे असल्याचे मानतात, तर असेही काही लोकं आहेत, जे व्यावसायिक माध्यमासाठी तसेच फॅशनचा भाग म्हणून देवाच्या फोटोंचा वापर करतात. तर असे करणे किती योग्य आहे? याबद्दल प्रेमानंद महाराज यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
लग्नपत्रिकेवर देवाचे फोटो वापरू नये
मथुरा-वृंदावनमध्ये प्रवचन देणाऱ्या प्रेमानंद महाराजांनी आपले मत मांडले आहे. ते म्हणतात, “जेव्हा मी बॅगांवर किंवा कार्डवर देवांचे फोटो पाहतो तेव्हा मला वाईट वाटतं. बॅग आणि लग्नाशी संबंधित वस्तू किंवा लग्नपत्रिका इत्यादींवर देवाचे फोटो किंवा छायाचित्रे वापरू नका. लग्नपत्रिकेवर फक्त मुला-मुलीचे नाव, तारीख आणि वेळ थेट लिहावी’
“लोकांची बुद्धी भ्रष्ट केली आहे….”
प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की, ‘देवाची प्रतिमा, भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लग्नाचे रूप, राधे श्याम जी यांचे लग्नाचे रूप, सिया राम जी यांचे लग्नाचे रूप हे लग्नाच्या कार्डवर छापले जाऊ नये. कारण लग्न झाल्यानंतर पत्रिका फेकून दिली जाते. काही लोक त्यांच्या प्रसिद्धीसाठी देवाचे पोस्टर लावतात. आणि मग काही काळाने नवे पोस्टर चिटकवण्यासाठी ते जुने पोस्टर फाडतात, व ते नाल्यात फेकून देतात. ही एक विकृती आहे. हा एकप्रकारचा स्वार्थ असून, याने लोकांची बुद्धी भ्रष्ट केली आहे.” ते पुढे असे देखील म्हणाले की, बऱ्याच बॅगांवर ‘राधे श्याम’ लिहिलेलं असतं, पण या बॅगमध्ये बूट आणि चप्पलसारख्या वस्तू भरल्या जातात, जे त्या वस्तू भरणाऱ्या माणसाला समजत नाही आणि त्याला सहमती देणाऱ्याला देखील कळत नाही. पण यामुळे ती बॅग घेणाराही पाप करतो, देणारा ही!” असं म्हणत त्यांनी आपल्याकडून विटंबना होईल अशापद्धतीने देवांचे फोटो छापू नयेत असा सल्ला त्यांनी दिला आहे.