अयोध्या : अयोध्येत असलेल्या अस्थायी राम मंदिरात (Old Ram Mandir) रामलालाचे दर्शन 20 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे. मात्र, मंदिरातील पुजारी त्यांची पूजा, नैवेद्य, आरती आणि सर्व विधी सुरू ठेवतील. या निर्णयाला आज मंजुरी देण्यात आल्याचे राम मंदिराचे विश्वस्त डॉ.अनिल मिश्रा यांनी सांगितले. पूजा आणि विधीनंतर तात्पुरत्या राम मंदिरातून भगवान श्रीरामाच्या मूर्ती नवीन मंदिराच्या गर्भगृहात ठेवल्या जातील. या संपूर्ण प्रक्रियेला दोन दिवस लागू शकतात.
डॉ मिश्रा म्हणाले की, रामललाला गर्भगृहाच्या आसनावर बसवण्यासाठी खगोल तज्ज्ञ आणि शिल्पकार यांच्यात चर्चा झाली आहे. त्यांनी सांगितले की, मंदिराच्या तळमजल्यावर 14 दरवाजे तयार आहेत. मुख्य दरवाजावर सोन्याचा मुलामा लावण्यात आला आहे. मंदिराचे जे काही काम शिल्लक आहे ते वेगाने पूर्ण केले जात आहे.
यूपीचे विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षेच्या दृष्टीने राम मंदिरातील दर्शन 20 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. यानंतर 23 जानेवारीपासून सर्वसामान्यांचे दर्शन सुरू होणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यूपी पोलिसही केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात आहेत. राम मंदिर आणि अयोध्या विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी UPSSF ची असेल. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने हॉटेल असोसिएशन आणि टॅक्सी युनियनशीही चर्चा केली आहे. प्रत्येकाला भाविक आणि पर्यटकांकडून केवळ ठराविक भाडे आकारण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12:20 वाजता सोहळ्याची शुभ वेळ निश्चित करण्यात आली आहे. पाच दिवसीय धार्मिक विधींच्या पवित्र मालिकेनंतर हा प्राणप्रतिष्ठेचा मुख्य कार्यक्रम असेल. 51 वैदिक पंडित विधी करतील, जे मंत्रोच्चार आणि यज्ञ करून दिव्य वातावरण निर्मिती करतील. यानंतर 23 जानेवारीपासून सर्वसामान्यासाठी मंदिर खुले असेल. मंदिरात प्रवेशासाठी ओळखपत्र आवश्यक असेल. याशिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरणे मंदिराच्या आत नेण्यास मनाई असणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोबतच राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे राष्ट्रीय महत्त्व दर्शवते. त्यांच्याशिवाय धार्मिक नेते, संत, राजकीय व्यक्ती, चित्रपट तारे आणि मान्यवरांचाही मेळावा होणार आहे.