अयोध्या : अयोध्येतील भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) स्वप्न सत्त्यात उतरत आहे. या भव्य मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजांच्या भव्यतेचा अंदाज यावरून लावता येतो की, येथील दरवाजे सोन्याने मढवलेले दिसतात. हे दरवाजे बनवणारे कारागीर हैदराबादच्या अनुराधा टिंबर इंटरनॅशनल कंपनीतून आले आहेत. या कंपनीचे मालक शरद बाबू यांनी सांगितले की, आम्ही हे काम फार कमी वेळात पूर्ण केले आहे. शरद बाबूंनी सांगितले की, हे दरवाजे नगारा शैलीमध्ये बनवण्यात आले आहेत. मोठ्या मंदिरांचे दरवाजे बनवण्याचा जुना अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. या आधारावर त्यांच्या कारागिरांनी लाकडावर अतिशय अचुक पद्धतीने कलाकृतींना आकार दिला आहे.
सोन्याने जडवलेले दरवाजे: शरद बाबू म्हणाले की, राम मंदिरात बसवण्यासाठी 14 सोन्याने जडलेले दरवाजे सोमवारी रामनगरीत पोहोचले. ज्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे दरवाजे बसवण्याचे काम 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ते म्हणाले की, अभिषेक सोहळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण केली जातील.
मंदिराच्या दरवाजासाठी लाकूड महाराष्ट्रातील गडचिरोली जिह्यातील जंगलातून आणण्यात आले होते. यासाठी विशिष्ट प्रकारचा सागवान खरेदी करण्यात आला आहे. शरद यांनी दावा केला की दरवाजांची बनावट आणि ते इतके मजबूत लाकडापासून बनवले गेले होते की ते पुढील 1000 वर्षे खराब होणार नाहीत.
गेल्या सहा महिन्यांपासून येथे दिवसरात्र काम सुरू असल्याचे शरदबाबूंनी सांगितले. सुमारे 60 कारागीर या कामात गुंतलेले आहेत. येथे शिफ्ट पद्धतीने काम सुरू आहे. कमी वेळेत मोठे काम करणे एखाद्या मोठ्या आव्हानापेक्षा कमी नाही. ते म्हणाले की, ही प्रभू रामाची विशेष कृपा आहे ज्यामुळे हे काम वेळेवर पूर्ण होत आहे. मंदिराच्या इतर भागातील काम देखील युद्धस्थरावर सुरू आहे. येत्या 22 जानेवारीला रामललाचा प्राण प्रतिष्ठापणेचा कार्यक्रम असणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती प्रमुख असणार आहे.