मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येत (Ayodhya) रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा भव्य कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण देशात उत्सव साजरा होणार आहे. मुंबई भाजपने देखील हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. भाजपकडून मुंबई राममय केली जाणार आहे. भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्ष राम मंदिराची लढाई लढली. त्यामुळे तो आमच्यादृष्टीने दिवाळीचा दिवस आहे असे भाजपचे मत आहे. या निमित्ताने मुंबईतील प्रत्येक वॉर्डात प्रमुख मंदिरामध्ये मिलन कार्यक्रम दाखवणे, उत्सव साजरा करणे असे कार्यक्रम होतील. मुंबईतील प्रत्येक वार्डातील दहा हजार घरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव केला जाणार आहे. याची तयारी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने केली जात आहे.
22 जानेवारी नंतर प्रत्यक्ष राम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घ्यावं म्हणून प्रत्येक विधानसभेतून एक विशेष ट्रेन करून सामान्य नागरिकांना भगवान रामाच्या दर्शनाला घेवुन जाणार आहोत अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राम मंदिर उद्घाटनाचा उत्सव मुंबईतही साजरा होणार आहे. मुंबईतील अनेक मंदिरात प्रभू रामाची आरता केली जाणार आहे. मुंबईतील सर्व वार्डात आयोध्येतील राममंदिराचा कार्यक्रम लाईव्ह दाखवणार आहे. या शिवाय येत्या दिवसात सर्व विधानसभा क्षेत्रातील नागरीकांना रामललाचं दर्शन घडवणार आहे. मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयातही आठ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्धाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. भाजपचे अनेक पदाधीकारी या कार्यक्रमाला हजर राहाणार आहे. एकंदरीतच भाजप निवडणूकीच्या दृष्टीने याचा फायदा करून घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.