अयोध्या :अयोध्येत प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरू आहे. आता सर्वांना 22 जानेवारीची प्रतीक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. मंदिर प्रशासानाकडून अगदी लहानातली लहान गोष्ट विचारपूर्वक केली जात आहे. याआधी मंदिर प्रशासनाने पुजाऱ्याच्या मुलाखती आणि प्रशिक्षणासंबंधी माहिती दिली होती. आता याबद्दल आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. पुरोहितांच्या निवडीतून श्री राम मंदिरातून सामाजिक समरसतेचा संदेशही संपूर्ण जगाला दिला जाणार आहे. वास्तविक, राम मंदिरासाठी निवडलेल्या 24 पुजार्यांपैकी 2 अनुसूचित जातीचे आणि 1 मागासवर्गीय आहे. राम मंदिराचे (Ram Mandir) महंत मिथिलेश नंदिनी शरण आणि महंत सत्यनारायण दास या सर्वांना विधी आणि पौरोहित्याचे प्रशिक्षण देत आहेत.
याआधीही ब्राह्मणेतर पुजारी नेमण्यात आले आहेत. इतकेच नाही तर दक्षिण भारतात बहुतेक ब्राह्मणेतर पुजारी मंदिरात नेमलेले आहेत. याबाबत अधिक माहिती देताना अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी सांगितले की, पुरोहितांची निवड जातीच्या आधारे नव्हे तर गुणवत्तेच्या आधारावर करण्यात आली आहे.
राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी पुढे म्हणाले की, स्वामी रामानंद म्हणाले होते की, जात-पात विचारू नका, जो हरीची पूजा करतो तो हरीचा होतो. समाजाला एक संदेश देण्यासाठी राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टने असा संदेश दिला आहे. राम मंदिरात 2 अनुसूचित जाती आणि 1 मागासवर्गीय असे 24 पुजारी पूजा करणार आहेत.
अयोध्या राम मंदिरासाठी 24 पुजाऱ्यांना 3 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. हे पुजारीही गुरुकुल परंपरा पाळत आहेत. या अंतर्गत बाहेरील लोकांशी संपर्क आणि मोबाईल फोन वापरण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये, 14 प्रश्नांची उत्तरे सोडवून 24 पुरोहितांची निवड करण्यात आली. मुलाखतीच्या 3 फेऱ्यांनंतर 3240 उमेदवारांपैकी 25 उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. नंतर एकाने आपले नाव मागे घेतले.