मुंबई : अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकची (Ramlala Abhishek) तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, संपूर्ण मंदिर सजवण्यात आले आहे. रामललाच्या अभिषेकपूर्वीचा पहिला भव्य फोटो समोर आला आहे. हा फोटो रामललाला गर्भगृहात बसवण्यापूर्वीचा आहे. फोटोत श्रीरामाच्या चेहऱ्यावर गोड हास्य, कपाळावर टिळक आणि हातात धनुष्यबाण दिसत आहेत. आता रामललाचे बालस्वरूप तात्पुरत्या मंदिरातून गर्भगृहात हलवण्यात आले आहे. अयोध्येत आज आणि उद्या रामललाचे दर्शन होणार नाही, आता 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतरच दर्शन घेता येणार आहे. आज 81 कलशांमध्ये भरलेल्या विविध नद्यांच्या पाण्याने गर्भगृहाचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. वास्तुशांती विधीही आज होणार आहे. या सगळ्यात मंदिराला फुलांनी सजवले जात असतानाच दिव्यांचीही सजावट करण्यात आली आहे.
रामललाचा 51 इंच उंच मूर्तीत पाच वर्षांच्या मुलाची प्रतिमा आहे. या काळ्या पाषाणाच्या मूर्तीमध्ये रामललाचे बालस्वरूप आहे. तुलसीदाच्या रामचरित मानसात वर्णन केल्याप्रमाणे कमलनयन अगदी तंतोतंत आहेत. चेहऱ्यावर बालसुलभ हास्य, एका हातात धनुष्य आणि दुसऱ्या हातात बाण घेऊन रामलला कमळाच्या फुलावर उभे आहेत. मूर्तीभोवती सनातन धर्माची चिन्हेही आहेत. भगवान राम हे हिंदू धर्मातील त्रिमूर्तीपैकी एक विष्णूचा अवतार मानला जातात, म्हणून रामललाच्या या मूर्तीवर शंख आणि चक्राचा आकार कोरलेला आहे.
22 जानेवारीला होणाऱ्या या सोहळ्यासाठी गर्भगृहाची सजावट करण्यात येत आहे. मंदिराचा प्रत्येक कोपरा अनेक क्विंटल फुलांनी सजलेला आहे. तात्पुरत्या मंदिरातील रामललाच्या मूर्तीलाही नवीन मंदिराच्या गर्भगृहात स्थान देण्यात आले आहे. गर्भगृहात विधी अखंड चालू असतात. यज्ञशाळेत अरणी मंथनाने निघालेल्या अग्नीने हवनाला सुरुवात झाली आहे. आज 20 जानेवारी रोजी देशातील विविध नद्यांमधून आणलेल्या पाण्याने राम मंदिराचे गर्भगृह पावन केले जाणार आहे. 81 कलशात पाणी भरून आणण्यात आले आहे, यासोबतच आज वास्तुशांती विधीही होणार आहे.
22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामललाला नैवेद्य दाखवला जाईल. 56 मिष्ठांन्नांच्या नैवेद्यांचा हा थाट खास तयार करण्यात आला आहे. हा नैवेद्य भाविकांमध्ये प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे. आता सर्व राम भक्त फक्त 22 जानेवारीची वाट पाहत आहेत त्यानंतर सर्व सामान्यांना दर्शन घेता येणार आहे.