मुंबई, पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हणतात. पुष्य योगात लग्न सोडून इतर सर्व शुभ कार्य केल्याने प्रगती होते अशी धार्मीक मान्यता आहे. या योगात विशेषत: नवीन व्यवसाय सुरू करणे, सोने खरेदी करणे, वाहन खरेदी करणे आणि घर घेणे अत्यंत शुभ मानले जाते. फेब्रुवारीमध्ये रवि-पुष्य योग (Ravi Pushya Yoga) तयार होत आहे. हा योग 5 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. रविपुष्य योग अत्यंत शुभ मानला जातो. हा योग संपत्ती वाढवणारा मानला जातो. पंचांगानुसार रविवारी जेव्हा रविपुष्य नक्षत्र येते तेव्हा त्या दिवशी रविपुष्य योग तयार होतो. 5 फेब्रुवारी 2023 चा शुभ मुहूर्त जाणून घेऊया-
05 फेब्रुवारी रोजी सकाळी 07:07 ते दुपारी 12:13 पर्यंत रविपुष्य योग आहे. याच काळात सर्वार्थ सिद्धी योगही तयार होतो. रविपुष्य योगासह सर्वार्थ सिद्धी योग सारखे शुभ योग यश वाढवतात. सर्वार्थ सिद्धी योग हा कार्य सिद्धीसाठी खूप महत्वाचा मानला जातो.
रविपुष्य योगात सोने, चांदीचे दागिने, वाहन, मालमत्ता इत्यादींची खरेदी शुभ आहे. या योगात खरेदी केल्याने प्रगती होते. संपत्ती वाढेल असे मानले जाते, रविपुष्य योगात व्यवसाय सुरू करणे देखील शुभ आहे.
रविपुष्य योगात सोन्या-चांदीच्या खरेदीपेक्षा कलश पूजा करणे अधिक शुभ आहे. असे केल्याने घरात धन-समृद्धी टिकून राहते. या तसेच एकाक्षी नारळाचीसुध्दा पुजा केली जाते. या नारळाच्या वरच्या बाजूला डोळ्यासारखी खूण असते, म्हणून त्याला एकाक्षी नारळ म्हणतात. एकाक्षी नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणूनच रविपुष्याच्या दिवशी ते घरी आणून, विधीवत पूजा करून तिजोरीत ठेवल्याने घरात धनाची कमतरता भासत नाही.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)