नंदी (Nandi) हे भगवान शिवाचे (Bhagwan Shiv) वाहन आहे. नंदीची मूर्ती ही कायम शिव मंदिराबाहेर (Shiv Temple) असते. शिव आणि नंदीचे नाते असे आहे की, जिथे शिव असेल तिथे नंदीही असेल. शिवपूजेत श्री गणेश, माता पार्वती आणि कार्तिकेय स्वामींसोबत नंदीचीही पूजा केली जाते. आपण अनेक मंदिरामध्ये पाहिले असेल की, शिवलिंगाशिवाय नंदीच्या कानातही प्रार्थना केली जाते (Saying wish in nandi’s ears). याबद्दल काही मान्यता आणि आख्यायिका आहेत त्या आपण जाणून घेऊया. नंदीच्या पूजेशिवाय शिवपूजा अपूर्ण मानली जाते. नंदीच्या कानात आपली इच्छा सांगण्याची परंपरा फार जुनी आहे. असे मानले जाते की भगवान शिव अनेकदा तपश्चर्येत लीन होतात. अशा स्थितीत नंदी भक्तांची इच्छा ऐकतो आणि तपश्चर्या पूर्ण झाल्यावर भक्तांची इच्छा भगवान शिव यांना सांगतो. यानंतर भगवान आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.
याशिवाय आणखी एक आख्यायिका आहे. पुराणात प्रचलित असलेल्या एका कथेनुसार ब्रह्मचर्य पाळणाऱ्या शिलाद ऋषींना आपला वंश पुढे नेण्याची चिंता होती. वंश पुढे नेण्यासाठी त्यांना मुलगा दत्तक घ्यायचा होता. या इच्छेने त्यांनी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पूजा करण्यास सुरुवात केली. शिलाद ऋषींच्या कठोर तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले, आणि वरदान देताना म्हणाले की, लवकरच त्यांना पुत्रप्राप्ती होईल. दुसऱ्याच दिवशी शिलाद ऋषींना शेतात एक सुंदर नवजात बाळ दिसले. तेवढ्यात त्यांना आवाज आला, “हे तुमचे मूल आहे, त्याची नीट काळजी घ्या.” काही काळानंतर शिलाद ऋषींना जेव्हा कळले की त्यांचा मुलगा नंदी अल्पायुषी आहे, तेव्हा ते खूप अस्वस्थ झाले. पण जेव्हा नंदीला हे कळले तेव्हा त्याने सांगितले की तो भगवान शिवाच्या कृपेने जन्माला आला आहे, म्हणून तेच त्याचे रक्षण करतील. वडिलांचा आशीर्वाद घेऊन नंदी भुवन नदीच्या काठी तपश्चर्या करायला गेला. त्यानंतर समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून बाहेर पडलेल्या अमृतावरून देव आणि दानवांमध्ये भांडण झाले. समुद्रमंथनातून अमृतासोबतच विषही बाहेर पडले. ते विष पिऊन भगवान शिव यांनी जगाचा उद्धार केला. या दरम्यान विषाचे काही थेंब जमिनीवर पडले होते, नंदीने ते प्याले. नंदीचे हे प्रेम आणि आसक्ती पाहून शिवाने नंदीला प्रथम भक्त ही पदवी दिली. त्याचवेळी लोक शिवाची पूजा करण्यासोबतच नंदीचीही पूजा करतील असेही सांगण्यात आले. तसेच जेथे भगवान शिव असतील तेथे नंदीही त्यांच्या सोबतच असेल असेही सांगण्यात आले.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. यातील कुठल्याही तथ्यांचा आम्ही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेलाही दुजोरा देत नाही.)