मुंबईः संत एकनाथ (Saint Eknath) महाराज म्हटलं की, तो गोदावरी तीरावरचा तो प्रसंग सगळ्यांना आठवतो. ते गोदावरीत अंघोळीला जातात आणि ते ज्यावेळी परततात त्यावेळी त्यांच्या अंगावर काठावर उभा असणारा माणूस थुंकतो, म्हणून ते पुन्हा अंघोळ करतात, असं त्यांच्या त्या आयुष्यात पाच-सहा वेळा होते, तो थुंकत असतो आणि एकनाथ महाराज पुन्हा पुन्हा अंघोळ करुन येत असतात, एक दिवस त्यांच्या अंगावर तो माणूस 108 वेळा थुंकतो (Spit), आणि संत एकनाथ त्या गोदावरीत (Godavari) 108 वेळा अंघोळ करतात. त्यांच्या कृतीने माणूस खजिल होतो आणि त्यांची माफी मागतो. त्याला पश्चाताप होतो आणि तो त्यांचा भक्त होतो. पण एकनाथ महाराज म्हणतात की तुझ्यामुळे मी निदान 108 वेळा अंघोळ तर केली.
एकनाथांचा हा प्रसंग कित्येक पिढ्या ऐकत आणि वाचत आला आहे. याच प्रसंगावर विनोबा भावेंनी दीर्घ असं लिहून ठेवलं आहे, ते म्हणतात, नाथांची सहनशीलता आणि शांती किती मोठी होती असेल, नाथांच्या या सहनशीलतेसारखीच स्वतंत्रसंग्रामातील सत्याग्रहात आहे असंही ते नमूद करतात. म्हणून संत परंपरेतही आपलं वेगळं पण ज्यांनी टिकवून ठेवलं ते संत म्हणजेच संत एकनाथ.
महाराष्ट्राच्या संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि समर्थ रामदास या पाच प्रमुख संतांपैकी एक महत्वाचे संत एकनाथ. संत एकनाथ हे लौकिक अर्थानं ते प्रापंचिक होते, पण त्यांचा प्रपंच हा अध्यात्माशी मेळ साधणारा होता. ज्ञानदेव, नामदेवानंतर अडीचशे वर्ष उलटल्यावर आणि तुकाराम, रामदासांच्या आधी पन्नास वर्षं असा हा एकनाथांचा काळ राहिला आहे.
संत एकनाथांनी आपलं सगळं आयुष्य ग्रंथरचना आणि पुराणकीर्तन यांच्या माध्यमातून लोकजागृती करण्यात सगळं आयुष्य घालवलं. त्यांच्या आयुष्यात जे जे त्यांनी केले आहे, ते सारं माझ्या गुरुप्रसादामुळे झालं असे ते मानत असत.
संत एकनाथांच्या रचना वाचताना समजतं की, त्यांचा गुरुविषयी असणारा आदर किती श्रेष्ठ आहे ते. त्यांच्या अनेक रचनातून ते आपल्या गुरुचा उल्लेख करतात, आणि तो सुद्धा पुन्हा पुन्हा करतात. रचना लिहिताना आणि लिहून झाली की, एकनाथ असा स्वतःच्या नावाचा उल्लेख ते कुठंही करत नसत,तर उल्लेख करत, एका जर्नादनी असा.
एक जर्नादनी म्हणजे सद्गगुरु जनार्दनांचा. एका म्हणजे जर्नादनांच्या चरणी नम्र असलेला एक असा स्वतःचा ते उल्लेख करतात. यातील एका हे संक्षिप्त रुप त्यांच्या नम्रतेचं दर्शन देणारं आहे. अशा या संत एकनाथांनी आपल्या गुरुंची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, श्रीभगवतगीता या ग्रंथांचा अभ्यास करुन त्यांनी संत साहित्यात सगळीकडे मुशाफिरी केली. संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते तर त्यांच्या आईची नाव रुक्मिणी होते.
एकनाथ महाराज संत असले तरी ते एक चांगले कवीही होते. संत एकनाथांनी आपल्या आयुष्यात दीर्घ असे लेखन केले आहे, त्यांनी अनुभवानंद, आनंदलहरी, एकनाथी अभंग गाथा, चिरंजीवपद, एकनाथी भागवत (भागवत पुराणातील अकराव्या स्कंधावर ओवीबद्ध मराठी टीका), चतु:श्लोकी भागवत, मुद्राविलास, भावार्थ रामायण (४० हजार ओव्या) हिंदीसह अनेक भाषांत भाषांतरे), भावार्थ रामायण,रुक्मिणीस्वयंवर, लघुगीता,शुकाष्टक टीका, स्वात्मबोध, संत एकनाथमहाराज कृत हरिपाठ – एकूण २५ अभंग, हस्तमालक टीका, ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण (ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ २५० वर्षांनंतर) ज्ञानेश्वरी च्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके १५०६ मध्ये पूर्ण केले. अशी दीर्घ साहित्य परंपरा त्यांनी आपल्या हातून लिहिली असली तरी एका जर्नादनी असा उल्लेख करुन त्यांनी आपल्या गुरुला महत्व दिले आहे. संत एकनाथ महाराजांनी ज्यादिवशी समाधी घेतली तो दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.
अशा संत असणाऱ्या पण तत्वज्ञानी माणसाविषयी काही गोष्टी सांगितल्या जातात त्यापैकीच ही एक. एकदा एक व्यक्ती संत एकनाथांकडे आली आणि म्हणाली की आम्हाला क्षणभरही शांती मिळत नाही. संत एकनाथ हे ब्राह्मण असले तरी त्या काळातही ते पारंपरिक ब्राह्मण नव्हते. म्हणून त्या आलेल्या व्यक्तीला त्यांनी सांगितले की, तुम्ही आता आठ दिवसांचेच पाहुणे आहात. संत एकनाथांनी हे सांगितल्यावर त्यांच्याकडे ज्या आशेने ती व्यक्ती आली होती, ती प्रचंड दुःखी झाली. त्या अस्वस्थपणातच ती व्यक्ती घरी गेली. संत एकनाथांकडे आलेल्या त्या माणसांनं घरी गेल्यावर ही गोष्ट आपल्या बायकोला आणि मुलांना सांगितली. मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप त्रास दिला, आता मी आठ दिवसांचा पाहुणा आहे, म्हणून मला माफ करा, असं म्हणत तो ज्या ज्या माणसांबरोबर वाईट पद्धतीने वागला होता त्यांच्याशी माफी मागू लागला. त्याच्या माफी मागण्यात आठ दिवस निघून जातात, मग त्याच्या लक्षात येते आणि पुन्हा तो मग नवव्या दिवशी संत एकनाथांकडे जातो आणि म्हणतो, नाथ, माझ्या शेवटच्या या घटकेला आता किती वेळ उरला आहे? त्यावर संत एकनाथ हसत हसत त्या माणसाला म्हणतात, तुझा शेवटचा क्षण मी कसा सांगणार तो तर देवच सांगेल. असं म्हणून ते त्या माणसाबरोबर बोलायचं ते थांबत नाहीत. ते त्याला विचारतात मला सांग हे तुझे शेवटचे आठ दिवस कसे गेले. त्यावर तो माणूस म्हणतो या आठ दिवसात मला माझ्या मृत्यूशिवाय दुसरं काहीच दिसलं नाही, पण या आठ दिवसात असा एकही दिवस गेला नाही की मी पश्चाताप केला नाही. मग त्याला ते सांगतात की, हे आठ दिवस तू ज्या पद्धतीने तू घालवले तसेच आम्ही सगळे दिवस घालवतो. म्हणून सर्वांशी प्रेमानं आणि मायेनं कायमच बोलत राहा आणि वागत राहा.
म्हणून संत एकनाथ ज्या कालखंडात वावरत होते, त्या काळात हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये धर्माच्या नावावर संघर्ष होते, दोघांचा अहंकार तीव्र होता. दोन्ही समाजांचे प्रबोधन करण्यासाठी हिंदू तुरुक संवाद हे काव्य नाथांनी लिहिले. वस्तुतः धर्मांधता ही वाईटच असते, कारण तिच्यामध्ये विवेकाला स्थान नसते हे त्याकाळी संत एकनाथांनी सांगून ठेवले आहे.
संबंधित बातम्या
Vastu | धोका ! घरातील या ठिकाणी असते राहूचे स्थान, दोष असल्यास जीवघेणं ठरु शकतं
Drone Photo | आस्था आणि श्रद्धेचं विराट दर्शन, आंगणेवाडीच्या जत्रेची विहंगम दृश्य