मुंबई, सध्या पितृ पक्ष (Pitru Paksha 2022) पंधरवाडा सुरु आहे. पितृपक्षात पितरांची पूजा आणि तर्पण केले जाते. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सुख-समृद्धी प्राप्त होते, असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षाच्या काळात सर्व पितर पृथ्वीवर राहतात. यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू झाला असून तो 25 सप्टेंबरला संपणार आहे. पितृ पक्षाची समाप्ती आश्विन महिन्यातील अमावास्येला होते, याला सर्व पितृ अमावस्या (SarvaPitru Amavasya 2022) म्हणतात. 25 सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्या आहे. पितृ पक्षाच्या दिवशी लोकं अनेक विशेष उपाय करून आपल्या पितरांना प्रसन्न करतात, ज्यामुळे त्यांच्या घरात पितृदोष राहत नाही आणि सुख-समृद्धी टिकून राहते. परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला या काळात तर्पण किंवा पितृशांतीचे उपाय करता आले नाहीत, तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता. चला जाणून घेऊया सर्व पितृ अमावस्येशी संबंधित खास उपाय.
सर्व पितृ अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. यामुळे पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात.
धार्मिक मान्यतेनुसार सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करावी. पितृ पक्षात पिंडदान-तर्पणला खूप महत्त्व आहे. यामुळे पूर्वज प्रसन्न राहतात आणि आपल्याला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात.
ज्योतिषांच्या मते, सर्व पितृ अमावस्येला दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते. सर्वपित्री अमावस्येला ब्राह्मणाला दान करावे. तसेच चांदीचे दान करणे श्रेष्ठ मानले जाते. यामुळे पूर्वज समाधानी राहतात, असे मानले जाते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)