मुंबई : दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीच्या दुसऱ्या दिवशी सर्वपितृ अमावस्या (Sarvapitru Amavasya 2023) येते. यंदा सर्वपित्री अमावस्या 14 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या आहे. या दिवशी पितृ पक्षाची समाप्ती होते. सर्वपित्री अमावस्येला पितरांची विशेष पूजा केली जाते. गरुड पुराणानुसार, पितरांची पूजा केल्याने मनुष्याला नश्वर जगात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. सर्वपितृ अमावस्येला दुर्मिळ इंद्र योग तयार होत आहे. या योगात पितरांना नैवेद्य अर्पण करणे शुभ असते. असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि कुटुंबावर आशीर्वादाचा वर्षाव करतात.
आश्विन महिन्यातील अमावस्या तिथी 13 ऑक्टोबर रोजी रात्री 09.50 वाजता सुरू होईल आणि 14 ऑक्टोबर रोजी रात्री 11.24 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 14 ऑक्टोबर ही सर्वपितृ अमावस्या आहे. या दिवशी तुम्ही कॅलेंडरने ठरविलेल्या वेळेनुसार तुमच्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करू शकता.
अश्विन महिन्यातील अमावास्येला इंद्र योग तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रात इंद्र योग शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या योगात पितरांचे श्राद्ध केल्याने साधकाला शुभ फल प्राप्त होते. हा योग सकाळी 10:25 वाजता सुरू होईल.
सर्वपित्री अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय शनिदेवही यामुळे प्रसन्न होतात.
गरजूंना मदत केल्याने भगवान शनि खूप प्रसन्न होतात. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी गरिबांना भोजन द्यावे.
ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्युतिथी आठवत नाही, ते सर्वपितृ अमावस्येला त्यांचे श्राद्ध करू शकतात. या दिवशी ब्राम्हणांना भोजनदान करण्याची पद्धत आहे. ब्राम्हणांना भोजनदान दिल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे. आंघोळ करून शुद्ध आचरणाने स्वयंपाक तयार करा. स्वयंपाक सात्विक असावा आणि त्यात खीर असावी. पितरांच्या फोटोला हार घालावा. त्यांची पूजा करावी व घरी बनविलेल्या अन्नाचा नैवैद्य दाखवावा. त्यानंतर पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)