मुंबई : हिंदू देवीदेवता वाहनांवर आरुढ असतात. देवी दुर्गेचं वाहन सिंह, विष्णुचं गरुड, गणपतीचं उंदीर वाहन आहे. तसंच तुम्ही अनेक फोटो किंवा मंदिरात शनिदेव कावळ्यावर आरुढ असल्याचं पाहिलं असेल. पण कावळा हे एकमेव वाहन शनिदेवांचं नाही. शास्त्रामध्ये शनिदेवांच्या 9 वाहनांबाबत सांगितलं गेलं आहे. व्यक्तीच्या कुंडलीतील नक्षत्र, तिथी आणि वारावरून वाहन ठरवलं जातं. शनिदेव कोणत्या वाहनावर आरुढ आहेत आणि ते जातकाला शुभ की अशुभ फळ देणार हे ठरतं. शनिदेवांना ज्योतिषशास्त्रात पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. असं असलं तरी शनिदेव न्यायदेवतेची भूमिका बजावतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, कावळ्यावर आरुढ असलेले शनिदेव जातकांना त्रासदायक ठरतो.यामुळे घरात सतत भांडणं होतात. घरातील शांतता कायमच भंग झालेली असते. अचानक अडचणींचा डोंगर उभा राहतो.जातकाच्या कुंडलीत शनिदेव घोड्यावर स्वार होऊन असतील. तर जातकाला शुभ फळं मिळतात. घोडा स्फुरण, शक्ती आणि विजयाचं प्रतिक आहे. त्यामुळे शनिदेव घोड्यावर स्वार असतील तर फलदायी ठरतात.
शनिदेव हंसावर आरुढ असतील तर शुभ मानलं जातं. यामुळे जातकाला नशिबाची चांगली साथ मिळते. जातकाला राजयोगाची स्थिती निर्माण होते. हंसाप्रमाणे जातकाला फळं मिळतात. शनिदेव हत्तीवर बसले असतील तर ते अशुभ असतं. त्यामुळे त्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होतो. त्यामुळे अशा व्यक्तीने स्वभाव शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. विनाकारण वाद करणं टाळावं.
शनिदेवांचं कोल्हा हे वाहन असेल तर त्रासदायक असतं. कारण अशा स्थितीत जातकाला कायम दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. तसेच केलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळत नाही. शनिदेव गिधाडावर आरुढ असणंही अशुभ आहे. यामुळे व्यक्तीला वारंवार आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. तसेच आरोग्यविषयक समस्या जाणवतात.
शनिदेव सिंहावर आसनस्थ असतील तर शुभ मानलं जातं. सिंह साहस, पराक्रम आणि समजुतदारपणाचं प्रतिक आहे. त्यामुळे सिंहावर आरुढ शनिदेव चांगली फळं देतात. शत्रुंवर सहज मिळवण्यात जातक यशस्वी ठरतात.
शनिदेव म्हैशीवर आरुढ असतील तर संमिश्र फळं मिळतात. म्हैस शक्तिशाली असते पण तरी अशी लोकं घाबरून राहतात. गाढव वाहन असेल तर मेहनतीचं प्रतिक मानलं जातं. पण जातकाला यश मिळवण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते. पण यश मिळेल असं नाही. म्हणून गाढवही पाहिलं तर अशुभ वाहन आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)