मुंबई : आश्विन शुक्ल पक्षातील शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2023) आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी शारदीय नवरात्रीची सुरुवात आज 15 ऑक्टोबरपासून होईल आणि 24 ऑक्टोबरला दसऱ्याने समाप्त होईल. प्रतिपदा तिथीला घटस्थापनेने नवरात्रीची सुरुवात होते. घटस्थापनामध्ये देवीच्या नावाने कलशाची स्थापना केली जाते. त्यानंतरच देवीच्या व्रत आणि पूजा सुरू होते. चला जाणून घेऊया शारदीय नवरात्रीत आज घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे. घटस्थापनेच्या विधीबद्दलही आपण जाणून घेऊया.
नवरात्रीच्या काळात घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिप्रदा तिथीला केली जाते. अभिजीत मुहूर्तावर घटस्थापना करणे शुभ मानले जाते. अभिजीत मुहूर्त आज 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.44 ते 12:30 पर्यंत आहे. 46 मिनिटांच्या या कालावधीत तुम्ही घटस्थापना करू शकता.
कलश हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते. त्यामुळे शुभ कार्यापूर्वी कलश बसवणे बंधनकारक आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या पूजेपूर्वी कलश स्थापित केला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून उपवास व पूजा करण्याचा संकल्प करावा. यानंतर, पाण्याने भरलेले कलश घ्यावे.
घटस्थापनेमध्ये सर्व प्रथम कलशावर मौली धागा गुंडाळा. यानंतर कलशामध्ये आंब्याची पाने टाकावी, कलशात एक सुपारी आणि नाणे टाकावे त्यानंतर त्यावर नारळ ठेवावे. हे कलश देवीच्या उजव्या बाजूला ठेवावे. यानंतर उदबत्ती आणि दिवा लावून दुर्गा देवीचे आवाहन करा आणि षोडशोपचार पुजा करा.
नवरात्रीच्या काळात संपूर्ण नऊ दिवस सकाळ आणि संध्याकाळी पूजा करावी. दोन्ही वेळा मंत्राचा जप करा आणि आरती देखील करा. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीचे पठण करणे उत्तम. त्याचे नियमित पठण करत रहा. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा नैवेद्य दाखवा.
शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या घरात पवित्रता ठेवा. सकाळ संध्याकाळ देवीची पूजा करावी. जर तुम्ही व्रत ठेवत असाल तर फक्त पाणी आणि फळांचे सेवन करा. घरात लसूण, कांदा किंवा मांस खाण्यास मनाई आहे. व्रत पाळणाऱ्यांनी काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नयेत. ज्या ठिकाणी कलश आणि अखंड ज्योती प्रज्वलित केल्या जातात त्या ठिकाणचे पावित्र्य जपा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)