मुंंबई, पंचांगनुसार माघ महिन्यात येणार्या एकादशीला षटतिला एकादशी (Shattila Ekadashi 2023) असे म्हणतात. यावर्षी हे व्रत 18 जानेवारी 2023 रोजी बुधवारी पाळले जाणार आहे. या एकादशीमध्ये भगवान विष्णूची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याचा विधी आहे. एकादशी तिथीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि दुःख व दारिद्र्य यापासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा षटतिला एकादशीला दुर्मिळ योगायोग घडत आहे. यावेळी षटतिला एकादशीला वृद्धी, अमृत सिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी या तीन शुभ योगांचा दुर्मिळ संयोग होत आहे. या तीन शुभ योगांचे महत्व म्हणजे सर्वार्थ सिद्धी योगाची वेळ सकाळी 7.17 मिनिटांपासून सायंकाळी 5.23 मिनिटांपर्यंत असेल. त्याचबरोबर सकाळी 7.17 ते सायंकाळी 5.23 पर्यंत अमृत सिद्धी योग असेल. त्याचबरोबर वृद्धी योग 18 जानेवारीला पहाटे 5.59 ते 19 जानेवारीला पहाटे 2.47 पर्यंत असेल.
षटतिला एकादशीची कथा अशी आहे की एका श्रीमंत स्त्री होती ती महागड्या वस्तू, दागिने, कपडे आणि इतर वस्तू दान करायची, पण अन्नदान करत नसायची. अन्नदानाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी श्रीकृष्णाने भिक्षूकाच्या वेशात अन्न मागितले मात्र महिलेने अन्न दिले नाही. श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा अन्न मागू लागले, ती स्त्री चिडली आणि भिक्षा पात्रात मातीचा गोळा टाकला. ती महिला घरात गेली तेव्हा तिला दिसले की सर्व अन्न आणि धान्य मातीत बदलले आहेत. दुःखामुळे ती महिला आजारी पडली. स्वप्नात देवाने तीला अन्नदान करण्यास सांगितले. महिलेने माघ महिन्यातील एकादशीचे व्रत करून अन्नदान केले. यामुळे या आजारातून त्यांची सुटका होऊन वैभव परत मिळाले.
या वेळी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात षटतिला एकादशी मंगळवार, 17 जानेवारी रोजी 6.05 मिनिटांनी सुरू होईल आणि बुधवारी, 18 जानेवारी 2023 रोजी 4.3 मिनिटांनी समाप्त होईल. उदया तिथीमुळे 18 जानेवारीला षटतिला एकादशी व्रत पाळण्यात येणार असून पारण्याची वेळ 19 जानेवारी रोजी सकाळी 7.14 ते 9.21 अशी असेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)