शिर्डी, रविवार, 15 ऑगस्ट आणि पतेती असे तीन सण लागून आल्याने मोठयासंख्येने भाविक साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला (Shirdi) आले होते. पाच दिवसाच्या कालावधीत भक्तांनी साईचरणी 3 कोटी 55 लाखांचं रोख दान साई चरणी अर्पण केले आहे (Shirdi Donation). लागून आलेल्या सुट्यांमुळे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत असल्याचे पहायाला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल पावणे तीन लाख भाविकांनी साई बाबांच दर्शन घेतलं आहे. साई बाबांच्या चरणी येणाऱ्या दानामध्ये देखील मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये साई बाबांच्या चरणी भाविकांनी तब्बल तीन कोटी पंचावन्न लाख रुपयांचे दान अर्पण केले आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. निर्बंध हटवण्यापूर्वी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या संख्येवर मर्यादा होती. मात्र आता ही मर्यादा हवटवण्यात आल्याने मोठ्या संख्येने भाविक शिर्डित दाखल होत आहेत.
साई बाबांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत असल्याने पूजेचे साहित्य, हार आणि इतर दुकानदारांनाही याचा फायदा होतोय. कोरोनामुळे निर्बंध असल्याने गेली दोन वर्ष स्थानिक दुकानदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. सर्व निर्बंध हटविल्यामुळे आणि आता लागून सुट्या आल्याने थानिक व्यावसायिकांमध्ये समाधान आहे.
लागून सुट्या आल्याने बच्चे कंपनी फिरायला जाण्याचा हट्ट करीत आहेत. पालक संपूर्ण परिवारासह शिर्डीला येत असल्याची चित्र आहे. लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीला येत असल्याने अनेक हॉटेल फुल्ल आहेत. टॅक्सी व्यावसायिकांनाही याचा फायदा होत असल्याने व्यावसायिकांमध्ये समाधान आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून सतत कोसळणाऱ्या पावसानेही विराम घेतल्याने वातावरणात थंडावा आलेला आहे. पर्यटनासाठी हे वातावरण पोषक असल्याने अनेकांची पाऊलं शिर्डीच्या दिशेने वळत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातले लोकं सहसा शिर्डीला जाण्यास प्राधान्य देतात. शिर्डीवरून नाशिक आणि त्रम्ब्यकेश्वरला जाणारे पर्यटकही अधिक असतात.