शिर्डी : देशासह परदेशातही शिर्डीच्या साई बाबांचे (Shirdi Sai Baba) भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या आठवड्यात नाताळ आणि नव वर्षानिमित्त लागून सुट्या आल्या होत्या या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांनी साई बाबांचे दर्शन घेतले. सहसा नवीन वर्षाच्या सुरूवातीला शिर्डीमध्ये गर्दी होत असते, मात्र यंदाची संख्या ही विक्रमी ठरली आहे. नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताला शिर्डीत साईदर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईबाबांना भरभरून दान दिले आहे. दहा दिवसात एकुण 16 कोटी रूपये साईबाबांच्या चरणी अर्पण केले आहे. यामुळे संस्थानाच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे.
शिर्डीत 23 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान तब्बल आठ लाख भाविकांनी साईदर्शन घेतले आहे. साईदर्शनाला आलेल्या भाविकांनी भरभरून दान दिले असून विविध माध्यमातून दहा दिवसात जवळपास 16 कोटी रूपये साईबाबा संस्थानाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नविन वर्षाचे स्वागत साईदर्शनाने करण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती आलेल्या या भक्तांना साईबाबांना भरभरून दान अर्पण केले आहे.
यापैकी दानपेटीत केलेल्या दानाची आकडेवारी 7 कोटी 80 लाख रूपये आहे. तर देणगी काऊंटर जमा झालेल्या दानाची रक्कम 3 कोटी 53 लाख रूपये इतकी आहे. ऑनलाईन देणगीतुन संस्थानाला तब्बल 4 कोटी 21 लाख रूपयांचे उत्पन्न झाले. याशिवाय 32 लाख रूपयांचे सोने तर 7 लाख 67 हजार रूपये किमतीची चांदी अर्पण करण्यात आली आहे. विविध माध्यमातून एकुण 15 कोटी 96 लाख रूपयांचे भरभरून दान भक्तांनी दिले आहे. तर दुसरीकडे 6 लाख भाविकांनी मोफत भोजनप्रसाद घेतला. संस्थानाकडून 11 लाख लाडू पाकीटांची विक्री करण्यात आली तर 7 लाख 46 हजार भक्तांना मोफत बुंदी पाकीट प्रसादाच्या स्वरूपात देण्यात आले.