महादेवाच्या मंदिरात (Shiv Temple) पूर्ण प्रदक्षिणा घालण्यास मनाई असते. शंकराच्या बहुतेक मंदिरांमध्ये लोकांनी पूर्ण गोल प्रदक्षिणा घालू नये म्हणून परिक्रमा मार्ग मध्येच बंद केलेला असतो. शिवलिंगाची अर्धी परिक्रमा घालण्याचा शास्त्रात नियम आहे. शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींना अनेक महत्वाची करणं असतात आणि त्याही आधी आपलं म्हणजेच भक्ताचं हित त्यात सामावलेलं असतं. शिवलिंगावर अभिषेक घातला की तो अभिषेक जिथून बाहेर पडतो, त्याला निर्मली किंवा जलधारी किंवा सोमसूत्र असं म्हणतात. त्या सोमसूत्रात काय असतं ? तर तिथे ऊर्जा असते आणि ही ऊर्जा अतिशय गरम आणि शक्तिशाली असते. शिवलिंग (Shivling) हे शिव आणि शक्ती यांचं प्रतिक आहे.
त्या पिंडीला शाळुंकेने धरून ठेवलं आहे. शाळुंका म्हणजे शक्ती, जी अतिशय शक्तिशाली असते आणि जल, दूध किंवा ज्याने अभिषेक घातला आहे, तो अभिषेक जलधारीतून बाहेर पडताना ती ऊर्जा त्यात मिसळून जाते. ही ऊर्जा मानवाच्या शरीरासाठी चांगली नाही. आपण ते सोमसूत्र पायाने ओलांडलं की ही ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व मनावर होतो अशी मान्यता आहे.
याचा एक श्लोक आहे –
”अर्द्ध सोमसूत्रांतमित्यर्थ: शिव प्रदक्षिणीकुर्वन सोमसूत्र न लंघयेत ।।
इति वाचनान्तरात।”
आता हा दोष कुठला आहे, जो सोमसूत्र ओलांडल्याने लागतो ! शरीरावर असा काय परिणाम होतो ? सोमसूत्र ओलांडल्याने वीर्य निर्मितीवर प्रतिकूल परिणाम होतो असे म्हणतात. आपल्या शरीरातील पाच प्रकारच्या वायूंवरही याचा वाईट परिणाम होतो. आपण जांभई देतो, ही कृती देवदत्त वायुमुळे होते तसेच धनंजय वायू, हा वायू आपल्या संपूर्ण शरीरात इकडून तिकडे फिरत असतो, शरीराचे सगळे अवयव नीट काम करावेत या प्रयत्नात हा वायू असतो आणि मृत्युनंतरही हा वायू आपल्या शरीरात त्याचं अस्तित्व राखून असतो; या दोन वायूंच्या प्रवाहात सोमसूत्र ओलांडल्याने अडथळा निर्माण होतो. याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावरही होतो. म्हणून शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही आणि निर्मली आली की परत फिरायचं. हा नियम आहे.
पण, सोमसूत्रावर जर गवत, पानं, दगड, विटा, लाकूड असं काही ठेवून ती निर्मली झाकून ठेवली असेल तर सोमसूत्र ओलांडण्याचा दोष लागत नाही. पण तरीही ‘शिवस्यार्ध प्रदक्षिणा’ हे म्हटलेलं आहे म्हणजेच शिवाची प्रदक्षिणा ही नेहमी अर्धीच घालावी.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)