अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!…. !!अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! असं म्हटलं की आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. स्वामी समर्थांची नितांत भक्ती करणारे करोडो भक्त आहेत. दर गुरुवारी स्वामी महाराजांना नैव्यद्य देणे, स्वामींचा जप करणे, तारकमंत्र म्हणणे, चरित्र वाचणे किंवा मठात जाऊन त्यांचे डोळे आणि मनभरून दर्शन घेणे म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तासाठी एक पर्वणीच असते. आपण जेव्हा ‘श्री स्वामी समर्थ’ असा मंत्रजप करतो तेव्हा किती माळ आपण हा जप केला एवढचं पाहतो.
पण “श्री स्वामी समर्थ” या जपाचा कधी अर्थ समजून घेतलाय का हो?, अर्थातच नाही. कारण आपल्याला वाटतं असतं की ‘श्री स्वामी समर्थ’ हा स्वामींचा नामजप आहे. पण तसं नाहीये ते फक्त स्वामींचे नाव आहे म्हणून जप करायचा असा त्याचा अर्थ होत नाही. या नावात पण एक अर्थ दडला आहे जो की प्रत्येक स्वामी भक्ताने जाणून घेतलाच पाहिजे अन्यथा जपाचा काय उपयोग, कारण विनाअर्थ तो जप करणे अर्थपूर्ण कसं होणार? चला तर, मग आज गुरुवार (31 ऑक्टोबर 2024) आजच्या दिवशीच जाणून घेऊयात या मंत्राचा नेमका अर्थ काय आहे
‘श्री स्वामी समर्थ’चा अर्थ काय?
श्री स्वामी समर्थ दत्ताचे अवतार मानले जातात. स्वामी समर्थ यांना सर्व गोष्टी ज्ञात होत्या, असं म्हटलं जातं की, स्वामी समर्थ आपल्या भाविकांची हाक ऐकून त्यांच्या मदतीला धावून येतात. असे अनेक अनुभव कित्येक भक्तांच्या एवढच काय तर कलाकारांच्या तोंडूनही ऐकले असतील. स्वामी समर्थांच्या लिलांविषयी
अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. ‘भि.ऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’असा मंत्र स्वामी समर्थांनी जगाला दिला आहे. ‘श्री स्वामी समर्थ’ नावाचा उच्चार केला तरी वेगळी ऊर्जा मिळते, अशी भक्तांची धारना आहे. तर, आज आपण स्वामी समर्थांच्या याच नावाचा अर्थ जाणून घेवूयात.
षडाक्षरी स्वामी नाम ‘श्री स्वामी समर्थ’ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्माण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक बीज मंत्र आहे, असे सांगितले जाते. ‘श्री स्वामी समर्थ’ हाही सद्गुरु मंत्र आहे. या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे अंतरीक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते, असा अनुभव आहे.
ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुदेव दत्त हे ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, त्याचप्रमाणे समानार्थी ‘श्री स्वामी समर्थ’ हा सुद्धा सद्गुरु मंत्र आहे. या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे अंतरीक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते असं म्हटलं जाते.
मंत्राची फोड करून समजून घेऊ
‘श्री’ म्हणजे स्वयं श्रीपादविराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास ‘स्वाः + मी’ अशी होते. ‘स्वाः’ म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि ‘मी’ म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईर्ष्या. अर्थात ‘स्वामी’ म्हणजे ‘माझा मी पणा स्वाः करा.’ तर, ‘समर्थ’ म्हणजे ‘संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा.’
त्यायोगे ‘श्री स्वामी समर्थ’ म्हणजे ‘श्रीपादविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करुन स्वयंभु शिव तत्त्व सद्गुरुकृपे अंकित करा’. असा ‘श्री स्वामी समर्थ’ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे. आता इथूनपुढे जेव्हा कधी तुम्ही ‘श्री स्वामी समर्थ’ हा महाराजांचा मंत्रजाप कराल तेव्हा हा अर्थ लक्षात नक्कीच राहिलं आणि तो मंत्रजाप खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)