सीता नवमी
Image Credit source: Social Media
मुंबई : हिंदू दिनदर्शिकेनुसार,
सीता नवमी (Sita Navmi 2023) दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, माता सीतेचा जन्म या दिवशी झाला होता, म्हणून या दिवसाला सीता जयंती किंवा जानकी नवमी असेही म्हणतात. या विशेष दिवशी माता सीतेची पूजा केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात. चला जाणून घेऊया, 2023 मध्ये सीता नवमी कोणत्या दिवशी साजरी केली जाईल, शुभ मुहूर्त आणि महत्त्व?
या तारखेला आहे सीता नवमी
हिंदू दिनदर्शिकेनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला सीता नवमी असते, यंदा शुक्रवार, 28 एप्रिल 2023 रोजी दुपारी 04:01 वाजता सुरू होईल आणि 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 06:22 वाजता समाप्त होईल. सीता नवमी उत्सव 29 एप्रिल 2023, शनिवारी साजरा केला जाईल. पंचांगानुसार, या दिवशी रवि योग तयार होत आहे, जो दुपारी 12:47 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 05:42 पर्यंत राहील.
सीता नवमीचे महत्त्व
माता सीता हे माता लक्ष्मीचे रूप आहे, अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणून या विशेष दिवशी माता सीतेची पूजा केल्याने माता लक्ष्मी स्वतः प्रसन्न होऊन साधकाला सर्व प्रकारच्या सुखांचा आशीर्वाद देते. सीता नवमीच्या दिवशी पूजा केल्याने रोग, दोष आणि कौटुंबिक कलह यापासून मुक्ती मिळते, अशीही मान्यता आहे.
सीता नवमीची पूजा पद्धत
सीता नवमीच्या दिवशी शृंगारातील सर्व पदार्थ सीतेला अर्पण केले जातात. यासोबत गंध, फुले, धूप, दिवे, मिठाई इत्यादींनी विधिवत पूजा केली जाते. तिळाच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा या दिवशी लावला जातो. माता सीतेला लाल फुल खूप प्रिय आहे म्हणूनच या दिवशी त्यांना लाल किंवा पिवळी फुले अर्पण करावीत, असे केल्याने माता सीता लवकर प्रसन्न होते असे मानले जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)